चिमुरडे रात्रीच्या अंधारात गाडी घेऊन बाहेर पडले, 2.5 किमीपर्यंत कार पळवली पण समोर खांब येताच नियंत्रण सुटलं अन्...

 

Pandharpur live : लहान मुलांकडे दुर्लक्ष केल्यास अनेकदा ते असे काहीतरी उद्योग करतात ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यामुळे पालकांना मुलांवर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावं लागतं.

समोर असणाऱ्या धोक्यांची मुलांना अजिबात कल्पना नसते. त्यामुळे अनेकदा पालकांवर डोक्याला हात लावण्याची वेळ येते. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला असून, लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. याचं कारण म्हणजे मुलं थेट कार घेऊन घराबाहेर पडले होते. यात आश्चर्याची बाब काय असं वाटत असेल, तर या मुलांचं वय 3 आणि 6 वर्षं आहे. इतकंच नाही तर त्यांनी कार ठोकत अपघातही केला आहे. 

मलेशायिमधील आयलँड Langkawi येथे ही घटना घडली आहे. येथील 3 आणि 6 वर्षाचे दोन भाऊ रात्रीच्या वेळी आई-वडिलांची कार घेऊन घराबाहेर पडले होते. त्यांनी फक्त कार घराबाहेर काढली नाही तर तब्बल 2.5 किमीपर्यंत चालवत नेल. पण नंतर त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी एका खांबाला धडक दिली असं वृत्त CNN ने दिलं आहे. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओत अपघातानंतर लोकांनी गाडीभोवती गर्दी केल्याचं दिसत आहे. लहान मुलं गाडी चालवत होते हे पाहून जमलेल्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. व्हिडीओत लोकांनी मुलांभोवती गर्दी केली असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढत असल्याचं दिसत आहे. 

लोक त्यांच्याकडे गाडी घेऊन बाहेर का पडलात अशी विचारणा करतात. त्यावर मुलं आपण खेळण्यातील गाडी घेण्यासाठी निघालो होतो असं उत्तर दिल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले होते. तसंच दुर्घटनाग्रस्त झालेली Toyota Vios कार जप्त केली आहे. 

अपघातानंतर लोकांना एखादा चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असावा अशी शंका आली. यामुळे त्यांनी कारभोवती गर्दी केली होती. पण लहान मुलं गाडी चालवत होती हे पाहून त्यांना आश्चर्य वाटतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुलांची आई बाथरुममध्ये होती आणि वडील झोपलेले होते. हीच संधी साधत मुलं बाहेर पडली होती. 6 वर्षांचा मुलगा गाडी चालवत होता. त्याचा 3 वर्षाचा भाऊ शेजारी बसला होता. नियंत्रण सुटल्याने त्यांची कार वीजेच्या खांबावर जाऊन आदळली". अपघातात कारचं बोनेट पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. 

फेसबुकला या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामध्ये दोन्ही मुलं चालकाच्या सीटवर बसल्याचं दिसत आहे. यावेळी तेथील लोकांना ते आपण खेळण्यातील गाडी विकत घेण्यासाठी चाललो होतो असं सांगताना ऐकू येत आहे. "आई घरी आहे आणि आम्ही दुचानात जात आहोत," असं मोठा भाऊ सांगतो. त्यावर लहान भाऊ आम्हाला काळी कार विकत घ्यायची आहे असं सांगतो. दरम्यान पोलिसांनी दोघांचं नाव जाहीर केलेलं नाही.

Post a Comment

0 Comments