विनायका तू सिद्ध गणेशा...

मराठी सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत संगीतविश्वात आपला खास ठसा उमटवणारे, आघाडीचे संगीतकार अजय-अतुल श्रीगणेशाचे परमभक्त आहेत. त्यांनी संगीतक्षेत्रात पदार्पण केलं होतं ते 'विश्वविनायक' या बाप्पाच्या आल्बमनेच. गणरायाशी जडलेलं त्यांचं संगीतमय नातं त्यांनी 'मुंटा'शी शेअर केलंय. 

कुठल्याही कामाची सुरूवात आपण नेहमी गणेशपूजनाने करतो. आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांनी काही गोष्टी मनावर कोरून ठेवल्या आहेत. जेव्हा त्यांची प्रचिती आपल्याला येते तेव्हा श्रद्धा अधिक दृढ होते. 'विश्वविनायक' या गणपतीच्या वर्णनावर बेतलेल्या गाण्यांच्या आल्बमने आमच्या आयुष्यातल्या आवडीच्या कामाचा श्रीगणेशा झाला आणि बाप्पा तेव्हापासूनच आमचा मित्र झाला. गणपतीचं कुठलंही गाणं आमच्यासमोर शब्दरूपात आलं तरी ते जल्लोषासारखं मनात नाचायला लागतं. गणरायाचं वर्णन आणि त्याला संगीताची जोड या दोन्ही संकल्पना मनात यायचा अवकाश की आमच्यातला संगीतकार जागा होतो. आमच्या अंगात काहीतरी संचारल्यासारखंच होतं. 

मोठेपणी कोण होणार? असा प्रश्न ज्या वयात विचारला जातो तेव्हापासून आम्हा दोघांचंही उत्तर एकच असायचं...संगीतकार होण्याचं. शाळेतल्या पुस्तकातली कविता आम्ही कधी पद्यात म्हटल्याच नाहीत, तर त्याही आम्ही चालीतच गुणगुणायचो. करिअरचं माहिती नाही पण संगीतासोबत आपल्याला कायम राहायचं आहे हे मनात पक्कं होतं. आई-बाबांनी प्रोत्साहन दिलं आणि आम्हा दोघांचाही सुरांबरोबरचा प्रवास सुरू झाला. तरीही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर मुलांसारखंच नोकरी शोधणं वगैरे सुरू असताना, छोटे-मोठे कोर्सेस करत असतानाच पुण्यातल्या लोकल ग्रुप्ससोबत कधी गाणं म्हण तर कधी एखादं गाणं बसवून दे करायचो. संगीताची हौस भागवण्यासाठी आम्ही दोघंही तिथे धावायचो. धडपड सुरू होती पण नेमकी दिशा मिळत नव्हती. 

ज्या 'विश्वविनायक' आल्बमने अजय-अतुल हे नाव लोकांच्या मनापर्यंत पोहोचलं त्या आल्बममधली गाणी कशी सुचली याची पण एक गोष्टच आहे. तेव्हा यामागचं कारण होतं मनातला राग. त्यावेळी आम्ही पाहत होतो, की गणपती जवळ आले की बाप्पावरची खोऱ्याने गाणी मार्केटमध्ये यायची. कुठल्याही टुकार सिनेमातल्या एखाद्या गाण्याची चाल घ्यायची आणि त्यावर गणपतीचं वर्णन लिहायचं, की झाली गणपतीची कॅसेट. ही कॅसेट गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत, संकष्टीला वगैरे वाजायची. मुलं त्यावर कसेही अंगविक्षेप करत नाचायची. मनाला खूप त्रास व्हायचा हे बघताना. म्हणजे त्या काळातली आयटम साँग किंवा सुमार प्रेमगीतांच्या चालीवर गणरायांची गाणी रचली जायची. गणपती या नावातच इतकं चैतन्य आहे मग त्यासाठी अशी उसनवारी कशासाठी असा प्रश्न मनात येऊन राग यायचा. त्यामुळे जेव्हा 'विश्वविनायक' या आल्बममधली गजाननाची गाणी संगीतबद्ध करायला घेतली तेव्हा जे काही असेल ते ओरिजनल असेल अशी शपथच आम्ही घेतली होती. यातली एकेक चाल हृदयापासून आली आहे. 

Post a Comment

0 Comments