बाप्पावरची ‘श्रद्धा’

बॉलिवूडमधले अनेक तरुण कलाकार गणपती बाप्पाचे भक्त आहेत. श्रद्धा कपूर हे त्यातलंच एक नाव. गणरायावर असलेल्या निस्सीम भक्तीपोटीच घरातल्यांनी माझं नाव 'श्रद्धा' ठेवलं आहे, असं तिने 'मुंटा'शी बोलताना सांगितलं. 

दरवर्षी मी बाप्पांच्या आगमनाची आतुरतेनं वाट बघत असते. माझं आणि गणपती बाप्पाचं नातं अतूट आहे. माझ्यासह घरातील प्रत्येक जण गणपतीला खूप मानतो. गंमत म्हणजे, बाप्पावरच्या निस्सीम विश्वासामुळेच घरातल्यांनी माझं नाव 'श्रद्धा'ठेवलंय. 

आमच्या घरी दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना होते. यानिमित्त घरात मंगलदायी वातावरण असतं. घरच्या गणपतीच्या तयारीत मी दरवर्षी सहभाग घेत आले आहे. गणपती घरी आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत माझा सगळ्यांत सहभाग असतो. गेल्या दोन वर्षांपासून सिनेमाच्या शूटिंगनिमित्त मला गणेशोत्सवाची तयारी करता आलेली नाही, याची खंत वाटते. दरवर्षी आम्ही स्वत:च गणपतीची आरास करतो. आमच्या गणपतीचं यंदाचं ५१वं वर्ष असल्यानं हा उत्सव खूपच खास आहे. 

सुरुवातीपासूनच आमच्याकडे इको फ्रेंडली गणेशमूर्ती आणण्याची पद्धत आहे. घरी चवीष्ट नैवेद्य तयार केला जातो. त्यावर मी ताव मारायला नेहमीच तयार असते. सध्या मी 'एबीसीडी २'च्या तयारीसाठी विशेष डाएट फॉलो करतेय. मात्र, गणपतीच्या दिवसात नो डाएटिंग. मला मोदक प्रचंड आवडतात. गरम-गरम उकडीच्या मोदकांवर तूपाची धार... आहाहा... अप्रतिम... याहून दुसरं सुख असूच शकत नाही. 

Post a Comment

0 Comments