पंढरीत एटीएस पथक सज्ज

यांच्यावर नजर
दहशतवाद रोखण्यासाठी: शहरातील रोजच्या घडामोडींवर राहणार लक्ष
सचिन कांबळे■ पंढरपूर
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख पाच तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याच्या शक्यते वरून पोलीस प्रशासनाने पंढरपूरसाठी दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना केली आहे. हे पथक सज्ज झाले आहे.
देशात कोठेही दहशतवादी हल्ला झाल्यास पंढरपूरला हाय अलर्टचा इशारा देण्यात येतो. तत्काळ विठ्ठल मंदिर परिसरात जादा बंदोबस्त लावण्यात येतो. मात्र दररोज अशी तत्परता असावी या उद्देशाने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यांतर्गत दहशतवाद विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात पोलीस कर्मचारी डी. एम. लोंढे व जे. आय. तांबोळी यांचा समावेश आहे. हे पथक शहरातील रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे.
शहरातील लॉज, धर्मशाळा व मठांमध्ये कोण येतो व जातो यावरही या पथकातील कर्मचार्‍यांचे लक्ष राहणार आहे. नेटकॅफेचीही तपासणीही केली जाणार आहे.
यामुळे दहशतवादी कारवाई झाल्यास संबंधित आरोपींविषयी माहिती या पथकाला मिळण्यास मदत होणार आहे. मोबाईल व त्या संबंधित साहित्य विक्री करणार्‍या दुकानांमध्ये अचानक धाड टाकली जाणार आहे. यात दोषी आढळल्यास दुकान मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

या पथकातील कार्यपद्धती नियोजनबद्ध असणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व माहिती संकलित केली आहे. हे पथक शहरावर विशिष्ट पद्धतीने नजर ठेवण्याचे काम करणार आहे. मंदिर परिसराचा वेगळा आणि शहराचा वेगळा आराखडा या पथकाकडे तयार आहे. पंढरपुरात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार दहशतवाद विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील कर्मचारी शहरातील रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच हे कर्मचारी माहिती गोळा करण्यासाठी साध्या वेशात फिरणार आहेत.- किशोर नावंदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक ) 


यांच्यावर नजर 
■ मोबाईल शॉपी - २५
■ नेटकॅफे - ५
■ हिंदू सामाजिक संघटना - ६
■ मुस्लीम सामाजिक संघटना - ३
■ भंगार दुकाने - ७
■ लॉज - १५
■ धर्मशाळा व मठ - ४५
■ शाळा व महाविद्यालये - १७
■ जुने वाहनविक्रेते - २३

Post a Comment

0 Comments