साखर कारखानदार आणि शेतकरी यांचेसाठी एका वृध्द दांपत्याची स्फुर्तीदायक यशोगाथा
नेवासा, अहमदनगर
पंढरपूर लाईव्ह साठी- अविनाश कुटे-पाटील
(अॅटोकॅड इंजिनिअर)
शेती क्षेत्रातील कुठलेही ज्ञान नसताना 40 वर्ष साखर कारखाना क्षेत्रात नोकरी करून सेवानिवृत्तीनंतर नेवासा, अहमदनगर येथील 65 वर्षीय जेष्ठ नागरिक मनोहरराव कुटे-पाटील यांनी आधुनिक तंत्राद्वारे दुष्काळावर मात करतअंतर्गत पिकातून लाखोंचे उत्पादन मिळविले. त्यांच्या या यशाचे गमक काय ते खास आमच्या पंढरपूर लाईव्ह च्या वाचकांसाठी या लेखातून प्रसिध्द करत आहोत.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या निवासाने तथा कर्मभुमीने पावन झालेले व महाग्रंथ ज्ञानेश्वरी चे उगमस्थान असलेले नेवासे हे गांव, नेवासा बु॥ येथील मनोहरराव निळकंठ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शशिकला कुटे पाटील या जेष्ठ दांपत्यांनी श्री संत तुकाराम महाराज साखर कारखाना पुणे येथील रसायन विभागातून ज्यूस सुपरवायझर पदावरुन सेवानिवृत्त होत, साखर कारखाना सेवानिवृत्तीनंतर शेतीतले कुठलेही ज्ञान नसताना दुष्काळावर मात करत, अल्प शेतीतून आधुनिक तंत्राद्वारे ठिबक स्प्रिंकलर व विज नसतानाही डिजेल जनरेटरच्या सहाय्याने कमी पाण्यात अंतर्गत मिश्र पिकाचा प्रथम यशस्वी प्रयोग करत या हंगामात लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.केवळ 20 गुंठे क्षेत्रावर प्रथम मका पिकांचे 18 क्विंटल उत्पादनातून 30-35 हजार रु. या पिकानंतर याच क्षेत्रात कांदा लागवडीतून 10 टनातून 96 हजार रुपये तद्नंतर कोथिंबिरीच्या केवळ 10 गुंठे क्षेत्रातून 40 हजार रु. शिल्लक 40 गुंठ्यात कापुस अंतर्गत तुर, हरभरा पिकातून 80 हजार रु. व त्यानंतर काकडी या पिकातून 50 हजार रु. उत्पन्न काढत या जेष्ठ नागरीक कुटूंबाने तरुणांसमोर एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
सेवानिवृत्तीनंतर काय करावे? हा मोठा यक्ष प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो. आयुष्यभर साखर कारकान्यात सेवा करुन मिळालेली तुटपूंजी ग्रॅज्यूएटी, पी.एफ. फंडाची रक्कम भविष्यात उरलेल्या आयुष्यासाठी योग्य कारणी लागते का? पैसा कुठे गुंतवावेत? काय करावे? अशी द्विधा निर्माण होते. अनेक वर्षानुवर्षे सर्व्हीस निमित्त बाहेर गावी राहील्याने या व्यवसायातील सर्वांचेच गाव, नातलग यांचेशी संपर्क तुटलेला असतो. अशा परिस्थितीत गावी जावून, सर्वांशी जुळवून घेत योग्य निर्णय घेवून स्थिर होणे मुश्किल असते. परंतू जेष्ठांनी या सर्वांवर मात केली.
नोकरीमुळे आपले शेत कुठे? गावाकडील कुठला ही गंध, ज्ञान नसणारे हे दांपत्य वडीलोपार्जित पासून साखर क्षेत्रात सेवानिवृत्त असणारे कुटूंब परंतू आपल्या कुशाग्र प्रयोगशिल बुध्दीने साखर क्षेत्रात मोठं नाव कमविलेले मनोहरराव सेवानिवृत्तीनंतर शेती क्षेत्रात आधुनिक व सेंद्रीय शेतीतून काही तरी वेगळं करावं या जिद्दीने झपाटून गेले होते. महात्माजींना अभिप्रेत असणारा खरा ग्रामीण भारत खेड्यातच आहे. खेड्याकडे चला या उक्तीप्रमाणे पुर्णा साखर कारखाना वसमत परभणी व श्री संत तुकाराम साखर कारखाना पुणे येथुन रसायन विभागातील सेवानिवृत्तीनंतर थेट आपल्या मुळ गावी जाण्याचे निश्चित केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या निवासाने तथा कर्मभुमीने पान झालेले नेवासे गाव या कुटूंबियास आकर्षित करत होते.
तीन वर्षापूर्वी गावात प्रवेश - चोहोबाजूंनी नकारात्मक परिस्थिती
अनेक वर्षापासून पाण्याविना पडीक नापीक जमीन एकेकाळी गावाची शान असणारा पाटीलकीचा दुर्झर पडीक वाडा, सोबतीला भाऊबंदकी, गावातील तोंडबोली पाटीलकी व मोजनीराज यात्रेतील परंपरागत झेंड्याचा मान तेवढ्याच काय त्या जमेच्या बाजू... परंतू सर्व गोष्टीवर मात करत या जेष्ठ दांपत्यांनी तीन वर्षाच्या अविरत परिश्रमातून या वयात आधुनिक शेतीची कास धरत मार्ग काढला. अशोक कदम या तरुणाने नाथ बाबा हायस्कुलसमोर राहण्यासाठी जागा विकत दिल्याने या कुटूंबाने नेवासा-श्रीरामपूर हायवे लगत व शेतापासून 1 कि.मी. अंतरावर आपला ‘छोटासा आशियाना’ वसवला...
डिजेल जनरेटर शेतीचा यशस्वी प्रयोग
शेतीचे महत्व जाणून अल्प शेती असल्याने आधुनिक प्रगत व सेंद्रीय शाश्वत शेती करण्याचा मानस केला. त्यासाठी प्रथम पाण्याची गरज असल्याने बोअरवेल घेतला. ईश्वरकृपेने भरपूर पाणी लागले. परंतू तांत्रिक तथा महामंडळाच्या प्रशासकीय कागदपत्रांच्या जंजाळाची पुर्तता होऊ न शकल्याने वीज उपलब्ध झाली नाही.... मात्र न डगमगता दोघा पती-पत्नीने विचार केला व स्वयंप्रेरणेने तथा स्वखर्चाने कोणाची ही मदत न घेता प्रथम 12 के.व्ही.ए.डी.जी. सेट विकत घेतला. त्यास सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून छोटीशी डि.जी. रुम तयार केली. एक ठिबक सेट घेतला... झालं यंत्रसामुग्री तर तयार झाली..! दिनचर्या ठरली की, सकाळी 5:30 ते 11:00 वाजेपर्यंत शेतीची कामे करणे व 11 नंतर ऊन वाढत असल्याने घरातील स्वयंपाक, टीव्ही पहाणे व वाचन तसेच इतर कामे 12 ते 3 या वेळेत करायची व पुन्हा 3:30 ते सायं. 7:30 वाजेपर्यंत शेतीची उर्वरीत कामे करायची. अथक प्रयत्नांती व योग्य नियोजनाअंती मोठ्या धाडसाने उजाड माळरानावर अद्यायावत अशी आधुनिक पध्दतीची शाश्वत सेंद्रीय शेती करण्याचे मोठे कार्य वयाच्या 65 व्या वर्षी शेतीचे कोणतेही ज्ञान अवगत नसणार्या या दांपत्यांनी करुन दाखविले. पडीक माळरानावर नंदनवन वसविले... योग्य नियोजन- यशाची नांदी...
प्रथम बाभळेश्वर येथील पायरेन्स विज्ञान केंद्रातून माती व पाणी परीक्षण करुन सेंद्रीय खतांचे नियोजन केले व ठिबकाद्वारे कापसाचे उत्पादन काढले. त्यातून चांगली कमाई झाल्याने वृध्दत्व विसरून काम करण्याचा जोश अधिक वाढला व पुढील वर्षी मिनी स्प्रिंकलर सेट घेवून गव्हाचे भरघोस उत्पादन काढले. त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. आपल्या शेताचे मालक आणि मजूर आपणच बनूण या दोघा वृध्द दांपत्यांनी शेतीची काढणी, वेचणी, विक्री आदी सर्व कांही कामे स्वत:च केली यामुळे सहाजीकच खचारत कपात झाली आणि उत्पन्न सुध्दा वाढत गेले. त्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. केलेले कष्ट फळाला आले. अशा पध्दतीने ऐन उन्हाळ्यात जनरेटरच्या सहाय्याने ठिबक स्प्रिंकलर वर मका, गहु, कापुस, तुर हरभरा, काकडी, भेंडी, कोथिंबीर आदी भरघोस पिके अल्प क्षेत्रात या हंगामात घेतली.
ऐकले जनाचे-केले मनाचे... जननिंदेकडे दुर्लक्ष- निश्चियाकडे लक्ष..!
आत्ताचे यश वाखाणण्याजोगेच होते मात्र मागील वर्षाच्या काळात डोकावून पाहीले तर तेंव्हा लोक चेष्टा करत... जनरेटरवर कुठे शेती होतेय का..? शेती क्षेत्रातले कुठलेच ज्ञान नसताना सेवानिवृत्तीनंतर शेती विकासाचे स्वप्न बघताहेत.. या वयात यांनी केलेले धाडस, खटाटोप आणि मोठा खर्च... कसे जमणार हे सगळे..? या ना अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती इतरांकडून झाली की, मनास चटका लागे... मात्र सौ. च्या खंबीर साथीने व संतांच्या उक्तीनुसार ‘‘वृक्ष ही लावावी-जलाशये निर्मावी। वृक्ष-वल्ली आम्हा सोयरी॥ म्हणत आणि ‘‘एक तरी ओवी अनुभवावी’’ ही अध्यात्माची शिदोरी घेत जीवनात करावयाचे ते चांगलेच... जिद्द-चिकाटी-परिश्रम व आधुनिक शेतीच्या ध्येयाने झपाटलेल्या या वृध्द जोडगोळीने पुन्हा मागे वळून पाहीलेच नाही. वर्षानुवर्षे पडीक पडलेल्या नापीक जमिनीत तत्पूर्वी कधीही पीक येत नसे... पीक लागवडीसाठी खर्च मोठा- मिळालेले उत्पन्न करणावळीतच निघून जाई... हातात शून्य... पुढील रान तयार करणेकामी तथा मशागतीसाठी आणखी वरुन पाच ते सहा हजार रुपये खर्च येत असे... अशा या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतीचा विकास करायचाच.. हा ध्यास घेऊन अथक परिश्रमाच्या बळावर वयाच्या 65 व्या वर्षी ही निर्जीव जमीन सजीव करण्याची किमया तर केलीच मात्र यावर्षी ऐन दुष्काळात लाखोंचे उत्पन्न मिळवून त्यांनी शेती करणार्या नवतरुणांसमोर एक मोठा आदर्श घालून दिला आहे. कोणी येवो अथवा न येवो अथक परिश्रम व चांगले काम करत राहणे, इतरांना न दुखावता ‘तूच आहेस तुझ्या जीवनाा शिल्पकार’ या विचाराने प्रेरीत झालेले हे जेष्ठ दांपत्य ‘हा माझा मार्ग एकला... हरियाली और रास्ता।’ गुणगुणत अहोरत्र काबाडकष्ट व मेहनत करत आली... आजही करत आहे... सध्या त्यांच्या या कार्यात त्यांचा मुलगा अविनाश (अॅटोकॅड इंजिनिअर), पुतण्या प्रशांत, राजु (इंजिनिअर), बंधु ज्ञानेश्वर, विठ्ठल, चंद्रशेखर (रसायन तज्ञ केमिष्ट), भिमराज हापसे, दिनकर घोगरे, विजय व राजेंद्र तर्हाळ हेही सहभागी झाले आहेत.एका सर्वसामान्य दांपत्यांनी आपले स्वप्न साकार करताना घेतलेले अथक परिश्रम आणि प्रयत्नांचे सातत्य ठेवत यशाचे उत्तूंग शिखर गाठले.. त्यांची ही यशोगाथा सर्व तरुणाईला, नविन शेतकरी, निवृत्तसाखर कामगार व इतर होतकरूंना मार्गदर्शक ठरावी हीच तळमळ....
----------------------------------------------------------------------------------------------------पंढरपूरचे
पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या
कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे
आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या
तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


0 Comments