पुन्हा हिंदुत्ववाद बोकाळतोय.......
विकासाच्या मुद्दयावर व काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या भांडवलावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. त्याच वातावरणाचा फायदा घेवून अनेक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. पण गेल्या 6/7 महिन्यात विकासाच्या मुद्दयावर चर्चा होण्यापेक्षा भाजपचा रिमोट कंट्रोल आरएसएस व त्याच्या बगलबच्च्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने उचलून विकासाच्या मुद्दयाला बगल देण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु केले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचे काम सुरु केले. हिंदुत्वाच्या नावावर ब्राम्हणीझम देशावर आणणे हाच संघाचा अजेंडा असल्याने ते त्याबाबत सातत्याने अग्रेसर भुमीका मांडत आहेत. नव्हे तर त्या प्रमाणे कृती देखील करीत आहेत. हिंदु धर्मातील जातीय व्यवस्थेला नाकारुन अनेक हिंदूंनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायासह बौध्द धम्मात प्रवेश केला. व ती प्रक्रिया अद्याप ही सुरु आहे.
याबाबत हिंदू धर्ममार्तंडांनी व राजकीय लोकांनी चिंतन व चिंता न करता व राज्यघटनेने समानता स्विकारली आहे याकडे दुर्लक्ष करुन कांही धर्म बळजबरीने धर्मांतर करीत आहेत त्यामुळे धर्मांतर बंदीचा कायदा व्हावा अशा मागणीचा आलाप आळवण्यास सुरुवात केली. तसेच कांही लोकांना परत हिंदुधर्मात आणण्याची प्रक्रिया सुरु केली. परंतु त्यांना कोणत्या जातीत समाविष्ट केले याची मात्र वाच्यता कोठे केली नाही. यांचे हिंदुत्व व हिंदुराष्ट्र वाद म्हणजेच ब्राम्हणवाद आहे. मनुवाद आहे. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती चे दहन केले. व सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारी मानवतावादी वृत्ती ठेवून ‘भारतीय राज्यघटना’ बहाल केली. या राज्यघटनेचा आधार घेवूनच मुठभर लोक बहुजनांच्या मतावर सत्ता मिळवून बहुजनांच्या हिताचे निर्णय न घेता भावनिक निर्णय घेवून विकासाचा मुद्दा दुर्लक्षीत करीत आहेत. ही बाब या निमीत्ताने स्पष्ट झाली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणे, केंद्रातील मंत्रीपदे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभु यांना देणे, एकनाथ खडसेसह मित्र पक्षांना मुख्यमंत्री व इतर मंत्रीपदापासून डावलणे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व हिंदुमहासभेचे संस्थापक पं. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करणे या बाबी बहुजन समाजाला आनंदीत करणार्या नक्कीच नाहीत. मुठभरांच्या आनंदासाठी आणखी किती काळ भाजपा काम करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पुढील भारतरत्न पुरस्कारासाठी तरी बहुजनांचा विचार होणार का पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार! याकडे तमाम बहुजनांचे निश्चित लक्ष लागले आहे. कोणत्या जातीचा आहे यावरच या लोकांचे राजकारण, धर्मकारण अवलंबून आहे. कारण तोच त्यांचा खरा अजेंडा आहे. काँग्रेस प्रणीत सरकारने केलेल्या पराकोटीच्या भ्रष्टाचाराला वैतागून लोकांनी भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला इच्छा नसतानाही स्विकारले आहे. त्याचा पश्चाताप करण्याची वेळ मात्र फार लवकर येईल असे वाटत नव्हते. गांधीवादी व मनुवादी विचाराला आंबेडकरवादी हाच पर्याय आहे. पण अजूनही भारतीय जनतेला तो रुचत नाही. म्हणून या दोन विचारांच्या पक्षांची चंगळ सुरुच रहाणार व बहुजनांचे हाल होणार हे मात्र सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे.
................







0 Comments