कौशल्य प्रशिक्षित युवक घडविण्याचे देशासमोर आव्हान देवेंद्र फडणवीस; शिवराज सिंग चौहान यांचा ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कारा’ने सन्मान

पंढरपूर लाईव्ह

पुणे,ता. १२ : ‘‘भारत हा युवकांचा देश मानला जातो आणि देशाच्या विकासाची धुरा युवकांमध्ये आहे. मात्र, केवळ एवढ्यावर थांबून चालणार नाही, त्यांच्यात विश्‍वास निर्माण करुन कौशल्य प्रशिक्षित व रोजगारक्षम युवक तयार करण्याचे आव्हान देशासमोर आहे,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विकासाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर येण्याची राज्याराज्यांत स्पर्धा लागली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाचव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी मध्यप्रदेशचे मुुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पहिल्या ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, तिबेटचे पंतप्रधान डॉ. लोबसांग सांगे, माजी पोलिस महासंचालक शैलजाकांत मिश्रा, विश्‍वशांती केंद्र (आळंदी) आणि माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, छात्र संसद फाउंडेशनचे संस्थापक-संकल्पक व मुख्य समन्वयक प्रा. राहुल कराड, माईर्सचे विश्‍वस्त प्रा. प्रकाश जोशी, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘नेत्याने राजा बनून सत्ता उपभोगण्यापेक्षा राज्याचा सेवक मानून जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे देशाची सेवा केली, तर देशाचा झपाट्याने विकास होईल. व्यवस्थेतील भ्रष्टाचार हटविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. राज्य सरकारने भ्रष्टाचार हटविण्याची मोहिम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून आठ अधिकार्‍यांवर कारवाई करीत २०० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.’’
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यात २० हजार गावे दुष्काळग्रस्त आहेत. त्यातील पाच हजार गावे लवकरच दुष्काळमुक्त केली जाणार आहेत. शेतकर्‍यांना पाणी आणि वीज देण्यासाठी जलयुक्त शिवार ही नवी योजना तयार केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी धीर सोडू नये. राज्यात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार असून, त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. शिक्षण व्यवस्थेतही अनेक आमूलाग्र बदल विचाराधीन आहेत.’’
शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘‘युवकांनी ध्येय निश्‍चित करुन मेहनतीने प्रत्येक काम केल्यास जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एकेकाळी मध्यप्रदेश डबघाईला आलेल्या राज्यांमध्ये गणले जात होते. मात्र, आज मध्यप्रदेश अनेक बाबतीत अग्रस्थानी आहे. पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांबरोबरच शिक्षण, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर माझ्या सरकारने प्रभावी कामगिरी केली आहे. नवीन वीजकेंद्रे उभारल्याने चोवीस तास वीज देणे शक्य झाले आहे. ३० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले असून, कृषी क्षेत्रातील क्रांतीचा गौरव झाला आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याबरोबरच गरीबांना मोफत औषधे देण्याची योजना आम्ही राबविली आहे.’’
निवडणुकांमुळे विकासकामांत अडथळे येत असल्याचे सांगून शिवराज सिंग चौहान म्हणाले, ‘‘लोकसभेपासून ग्रामपंचायतींपर्यंत होणार्‍या निवडणुकांमुळे विकासकामांत खोडा घातला जातो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आणि वेळ खर्ची होतो. निवडणूक व्यवस्थेवर संशोधन होऊन सगळ्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील का, हे पाहायला हवे. त्याचबरोबर निवडणुकांत राज्याकडून निधी मिळण्याची व्यवस्था करायला हवी. पोटनिवडणुका टाळण्याचाही प्रयत्न करायला हवा.’’

भारतीय छात्र संसदेमध्ये वेगवेगळ्या सत्रांत मांडलेल्या आठ ठरावांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्‍वासन दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ‘‘देशातील युवकांमध्ये नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता आहे. तसेच मतपरिवर्तन करण्याचीही क्षमता आहे. युवकांनी प्रामाणिकपणा, जबाबदारी स्वीकारत स्वत:पासून सुरुवात केली, तर खर्‍या अर्थाने भारत स्वच्छ होईल.’’
प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी छात्र संसदेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारतीय युवक घडविला जात असल्याचे सांगितले. प्रा. राहुल कराड यांनी छात्र संसदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थी नेते स्मृति संस्था आणि शाश्‍वत शुक्ला यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम शर्मा यांनी केले. प्रा. डी. पी. आपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात व सांगता राष्ट्रगीताने झाली.

...................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 12 जानेवारी 2015 रोजी  42,040  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   12 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2490 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................


Post a Comment

0 Comments