असे होते छत्रपती शिवराय!

असे होते छत्रपती शिवराय!

पंढरपूर लाईव्ह साठी विशेष लेख
(शिवश्री अमरजित पाटील)
लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत....


विश्‍ववंदणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आजवर जगभरातील  इतिहास अभ्यासकांनी विविधांगी भरपूर लेखन केलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गुणांवर,त्यांच्या मोहिमांवर व त्यांच्या प्रशासन,राजकारण, धर्मकारण,अर्थकारण यासह त्यांच्या गड-किल्ल्यांबाबत व त्या गड-किल्ल्यांच्या बांधकाम तंत्राबाबत हि बरेच लिहीले गेलेले आहे. मुळामध्ये छत्रपती शिवराय म्हणजे अखंडपणेप्रवाहित असणारा प्रेरणादायी झरा आहेत. कित्येकांच्या जगण्याची छत्रपती  शिवराय हि जणू जिवनप्रणालीच आहेत. असे अनेकांची जीवनप्रणाली असणारे छत्रपती शिवराय नमेके कसे होते ? हे आपण या लिखानाच्या माध्यमांतून मांडण्याचा-पहाण्याचा प्रयत्न करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वाचा शोध घेणे हाच मर्यादित हेतू सदर लिखानाचा आहे. माझ्या हाती असणार्‍या अल्प ऐतिहासिक साधनांच्या, संदर्भग्रंथांच्या आधारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे होते छत्रपती शिवराय!


छत्रपती शिवरायांच्या समकालीन असणार्‍या अनेक लोकांनी छत्रपती शिवरायांना प्रत्यक्षात पाहिलेले होते. यामध्ये जसे भारतीय होते तसे काही परदेशी सुध्दा होते. जसे स्नेही-मित्र-सहकारी-नातेसंबंधातील लोक होते तसे शत्रु हि होते. शत्रुच्या पदरी असणारे वकील,कलावंत,चित्रकार ही होते. पण,या सर्वामध्ये फारच थोड्या व्यक्तींनी छत्रपती शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल लिहून ठेवले आहे.छत्रपती शिवरायांना  प्रत्यक्षात भेटणार्‍या व त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणार्‍या व्यक्तींमध्ये इंग्रजांचा राजदूत म्हणून मुंबईहून स्टीफीन उस्टिक हासन 1674 रोजी राजांना भेटला होता. तसेच, याशिवाय थॉस निकोलस (1673); ऑक्झेंडन (1674); सॅम्युअल ऑस्टिन,आर. जोन्सआणि एडवर्ड ऑस्टिन हे तिघे 1675 साली,तर लेफ्टनंट अ‍ॅडम्स आणि मॉलव्हेहर (1676) आणि जॉन चाइल्ड (1678) यांनी महाराजांचीप्रत्यक्षात भेट घेतलेली आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधलेला आहे. पण,यापैकी एकानेहि राजांच्या व्यक्तीमत्त्वाबाबत तपशिलवार असे काहिही लिहून ठेवलेले नाही. 1677 साली तेघनापट्टमच्या डच वखारीचा प्रमुख मोठा नजराणा घेऊन छत्रपती शिवरायांना भेटला होता. व याच महिन्यात इंग्ऱजांचा जर्मेन नावाचा प्रतिनिधीही कोलेरून नदीच्या तीरावर राजांना भेटला होता. पण,जी बाब युरोपीयन वकिलांची तीच बाब यांची हि. या लोकांना छत्रपती शिवरायांकडे असणार्‍या त्यांच्या कामामध्येच अधिक रस असल्यामुळे,संधी असून ही यापैकी एकाच्याहि लिखानातून राजांच्या व्यक्तीमत्त्वा बद्दल फारशी काहि माहिती मिळत नाही.ज्यांनी छत्रपती शिवरायांना प्रत्यक्षात पाहिले होते त्यांच्या हवाल्यावर एस्केलियट नावाच्या व्यक्तीने  महाराजांचे वर्णन, ‘मध्यम उंची आणि प्रमाणबद्ध शरीर’ असे केलेले आहे. तसेच,राजा कामात क्रियाशील ,नजरेत तिक्ष्ण आणि वर्णात इतरांपेक्षा गोरा असून तो नेहमी स्मितहास्य करीत बोलतो. असे ही नोंदवले आहे. थेवनॉट नावाच्या व्यक्तीच्या मते, राजे उंचीला कमी आणि तपकिरी वर्णाचे होते. राजांचे डोळेअतिशय तेजस्वी आणि तीक्ष्ण असून त्यातून त्याची श्रेष्ठ बुद्धिमत्ता जाणवते. तो नेहमी दिवसातून एकदाच जेवण घेतो आणि त्याचे आरो1/2 चांगले आहे.’ असे नोंदवलेले आहे. या लिखानातील छत्रपती शिवरायांचा करण्यात आलेला एकेरी उल्लेख काहिजनांना न रुचण्याची शक्यता आहे. परंतु, इंग्रजी भाषेध्ये आदरार्थी व ऐकेरी असा भेद लिखानात सहसा पाळला जात  नाही. याउपर सदर माहितीची विश्‍वासर्हाताकमी होत नाही. याठिकाणी  भाषेचा मुद्दा गौण मानला तर, एस्केलियट व थेवनॉटच्या लिखानातील एका मुद्याद्यावर मी माझे वैयक्तीक मत येथे नोंदवू इच्छित आहे. आणि ते  म्हणजे या दोन्ही व्यक्तींनी नोंदवलेला छत्रपती शिवरायांच्या शारिरीक  उंचीचा मुद्दा होय.  छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या अनेक गड-किल्ल्यापैकी एक महत्त्वाचा जलदुर्ग असणार्‍या सिंधुदुर्ग या किल्ल्यामध्ये तेथिल त्याकाळच्या कामगारांच्या आग्रहाखातर छत्रपती शिवरायांनी आपल्या उजव्या हाताचा  व डाव्या पायाचा ठसा तेथिल चुन्याच्या बांधकाम मिश्रणावर उठवलेला होता. सदर दोन्ही ठसे आज हि सुस्थितीत आपल्याला पाहवयास मिळतात. या दोन्ही ठशांचे मोजमाप घेऊन शरीरशास्त्र जाणणार्‍या  व्यक्तीकडून त्याची तपासणी करण्यात आल्यास आपल्याला आजहि छत्रपती शिवरायांच्या शारिरीक उंची बाबत परकीय व्यक्तींनी  नोंदवलेले मत तपासून पाहता येईल. हे काम नवीन दमाच्या इतिहास संशोधकांवर सोपवून आपण आपल्या मूळ विषयाकडे परत वळू या. छत्रपती शिवरायांना प्रत्यक्षात भेटणार्‍या परदेशी व्यक्तींपैकी एक असणार्‍या फादर डी
ऑर्किन्स यांचे मते,शिवाजीराजा चैतन्यशीलपण काहीसा अस्वस्थ  वाटतो. मात्र कितीही अस्वस्थ वाटला तरी तो निर्णय क्षमता आणि  पुरुषार्थ यात मुळीच कमी नाही.’ असे नोंदवतो. फादर डी ऑर्किन्स
यांच्या या मताला, तो कामात जलद आणि चालीत उत्साही होता. त्याचा चेहरा स्वच्छ आणि गौर होता. विशेषत: त्याचेकाळेभोर ,मोठे मोठे डोळे इतके चैतन्यपुर्ण होते की त्यातून तेजस्वी किरण बाहेर पडत आहेत असे वाटे. त्यात त्याची चलाख,स्वच्छ आणितीव्र बुद्धिमत्ता भरच टाकीत  असे. असे मत कॉस्मो दा गार्डा याने नोंदवून दुजोराच दिला आहे.
दिनांक 10 जानेवारी 1666 साली म्हणजे छत्रपती शिवरायांच्या 1664  साली केलेल्या सुरत स्वारीच्या दोन वर्षानंतर येवेन हा फ्रेंच प्रवासी सुरतेत आला होता. त्याने ऐकीव माहितीवरुन महाराजांचे वर्णन,’उंची  मध्यम,बांधा चपळ,तीक्ष्ण आणि तेजस्वी डोळे’ असे केलेलेआहे. तर एस्कॅलिओट नावाचा इंग्रज म्हणतो,ज्यांनी शिवाजीला पाहिले आहे ते मला असे सांगतात की तो मध्यम बांध्याचा आहे. मी उभा राहिलो तर जितका दिसेन त्याहून थोडा कमी, पण त्याचे शरीरसौष्ठव उत्कृष्ठ आहे.  तो व्यायामपटू आहे. तो जेव्हा बोलतो तेव्हा स्मितहास्यकरीत आहे असेच वाटते. त्याची दृष्टी तीव्र आणि तीक्ष्ण आहे. आपल्या स्वत:च्या लोकांत तो उठून दिसण्याइतका गोरा आहे.’ मराठ्यांच्या इतिहासाचा आद्य  चरित्रकार म्हणून ज्या ग्रँट डचचा उल्लेख केला जातो. त्यांनी आपल्या  पुस्तकात छत्रपती शिवरायांचे वर्णनकरताना म्हटले आहे,’त्याचे गुण लक्षवेदी व सवारचे मन जिंकणारे आणि सर्वाना आवडणारे होते. त्याचा   स्वभाव मनमोकळेपणाने वागणारा  ओळखीचा, आपलासा वाटणारा होता. त्याची ध्येयनिष्ठा अचल अशी होती तर तो आपल्या  सहकार्याशी व नातेसंबंधातील लोकांशी दयाळूपणे वागत होता. त्याची  उंची मध्यम व हालचाल चपळ होती. दिसण्यात रुपवान व विद्वान  दिसत होता. त्यांच्या उंचीच्या मानाने त्याचे हात लांब व पिळदार वाटत  होते. जे सर्वसामान्य मराठ्यापेक्षा सौंदर्यवान व उठावदार दिसत होते. तर एस. सेन नावाचा व्यक्तींने आपल्या ‘ट्रॅेव्हर्ल्स ऑफ थेव्हेनॉट अँड   कॅरेरी’ या आपल्या प्रवासवर्णनात राजांचे वर्णन, राजा हा मध्यम उंचीचा  व त्यांचे मोठे डोळे तिक्ष्ण व सावधानता व समयसुचकता दर्शवणारे होते.  ते दिवसातून एकदाच जेवण करीत होते व त्यांची तब्येत तंदुरुस्त होती.’  ज्याप्रमाणे परकीय व्यक्तींनी छत्रपती शिवरायांच्या व्यक्तींमत्त्वाच्या नोंदी नोंदवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतीय व्यक्तींेनी सुद्धा अल्पप्रमाणात  का होईना या संदर्भात नोंदी केलेल्या आहेत.  यामध्ये प्रामुख्याने दिनांक 12 मे 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या 50 व्या वाढदिवसा निमित्त होणार्‍या समारंभासाठी मिर्झाराजे जयसिंह व त्यांच्यात झालेल्या पुरंदर तहा नुसार आग्रा येथे पोहचले तेव्हा मिर्झाराजे जयसिंहाचा मुलगा रामसिंग याच्या पदरी  असणार्‍या परकालदास वैगेरे रजपूत अधिकार्‍यांनी रांजाना प्रत्यक्ष  पाहिल्यावर आपल्याविविध पत्रांतून,’अर सेवोजी डीलसा हकीर छोटासाही देखता दिसजी, अर सूरती बहुत अजाइब गोरो रंग’ असे  म्हणजे, ‘‘शिवाजी दिसण्यात बांध्याने किरकोळ आहे. पण स्वरुपाने विलक्षण गोरा आहे.’’ अशी नोंद केलेली आहे. सदर पत्रे राजस्थानी रेकॉर्डस या ग्रंथात सामाविष्टआहेत. जयपूर दरबारातील काही बातमीपत्रे  इंग्रजांनी परदेशात त्यांच्या सोबत नेली आहेत. त्या पत्रात छत्रपती शिवरायांशी प्रत्यक्ष बोलल्याचा व पाहिल्यानंतर केलेले वर्णन याचा  समावेश आहे. या पत्रापैकी एका पत्राचा बातमीदार असणारा रजपूत  बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलताना फारच भारावून गेल्याचा दिसतो. तो बातमीदार लिहतो, दख्खनच्या राजाला आम्ही आज प्रत्यक्ष पाहिले,त्याचा वर्ण गोरा आहे. नासिका सरळ आहे. डोळे भेदक आहेत.’ तर दुसरा बातमीदार लिहतो, मी त्यांच्याशी बोललो. काही प्रश्‍न  विचारले,त्याची समर्पक उत्तरे मला मिळाळी. त्याचा व्यक्तींवाद काय  वर्णावा ! आपण ऐकतो आणि लगेच ते शब्द आपल्याला पटतात, आवडतात. राजा अंतर्बाह्य सज्जन आहे.’ रजपूत बातमीदाराची बातमीपत्रे म्हणजे आँखो देखा म्हणजे ऐतिहासिक पुराव्याचा अस्सल ठेवा आहे.असाच एक अत्यंत अस्सल पुरावा सन 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंह हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात दक्षिणेच्या मोहिमेवर आले असता, मुघल सैन्यातील तोफखान्याचा अधिकारी,इटालियन प्रवासी, गोलंदाज व डॉक्टर असणारा निकोलावो मनूची याने आपल्या स्तोरिया दो मांगोर’ या आपल्या ग्रंथात,छत्रपती शिवराय व त्याच्या भेटीचा पुरावा नोंदवून ठेवला आहे. त्यामध्ये मनूची याने राजांनी त्याला युरोपातील राजांविषयी व तेथील धर्माविषयी सूचक प्रश्‍न विचारल्याचे नोंदविले आहे. याच ग्रंथाच मनूची याने राजांच्या अचानक येणे,स्पष्ट बोलणे,सावध वागणे विशेषत: त्यांच्या हालचालीतील लगबगी,तडफ या नेक्या टिपल्या आहेत. याच निकोलावो मनूचीचा चित्रकार मित्र असणार्‍या मीर महंद याने 1688 पूर्वी काढलेले राजांचे सर्वात अधिक विश्‍वासार्ह असणारे चित्र काढले आहे. आजमितीला छत्रपती शिवरायांची एकूण 13 अस्सल चित्रे उपलब्ध आहेत. असे आजच्या पिढीतील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (कोल्हापूर) यांचे मत आहे.
मीर महंदच्या अस्सल चित्राप्रमाणेच जनरल सलव्हानचे वॉरिअर्स अँड स्टेटसमेन ऑफ इंडिया’ या ग्रंथातील छत्रपती शिवरायांच्या  व्यक्तीमत्त्वाचे दर्शन घडवणारी नोंद अशी आहे. जनरल सलव्हान  लिहतात,. . . ‘‘चर्चेच्या वेळी सावध पण धूर्त आणि कामगिरीच्या  वेळी निभर्य व साहसी हे त्यांचे विशेष होत. त्यांची सहनशेी,ऊर्जा आणि निर्णयक्षमता अप्रतिम म्हणावी लागेल.’’ त्याच्या देशवासीयांनी काढलेल्या त्याच्या चित्रात शुभ्र घोड्यावरुन दौड करत असता ‘‘तो कच्चा तांदूळ तोंडात टाकीत जात असल्याचे दाखवले आहे. याचा अर्थ जेवण्यात घालविण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता.’’  या व अशा अनेक नोंदी सर्वप्रथम एकत्रित करुन छत्रपती शिवरायांचे व्यक्तींमत्त्व आपल्यासमोर मांडण्याचा कदाचित त्याकाळचा पहिलाच  प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे डॉ. बाळकृष्ण हे होय. डॉ. बाळकृष्ण हे मूळचे पंजाबचे होते. आर्यसमाजाचे अनुयायी व तत्त्वचिंतक होते. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालय आर्य समाजाच्या  स्वाधीन केल्यानंतर ते कॉलेजचे प्राचार्य म्हणून रजू झाले होते. त्यांनी  सतत 12/13 वर्ष असाधारण परिश्रम करुन शिवाजी द ग्रेट’ हे चार खंडाचे शिवचरित्र सिद्ध केले. या ग्रंथाचे वैशिष्ठ्य हे,की तो प्रामुख्याने डच,पोर्तुगीज, इंग्लिश साधनांच्या आधारे लिहिला गेलेला इतिहासग्रंथ आहे. अशी डॉ. बाळकृष्ण व त्यांच्या कार्याची माहिती डॉ. जयसिंगराव  पवार यांनी महाराष्ट्र   राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ,पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ’छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत नोंदवलेले आहे. डॉ. बाळकृष्ण यांनी युरोपीयन, डच, पोर्तुगीज, इंग्रजादी वकिलांनी, रजपूत  बातमीदारांनी व परदेशी प्रवाशांनी नोंदवलेल्या नोंदीवरुन आपल्या समोर जे छत्रपती शिवरायांच्या व्यक्तींमत्त्वाचे पैलू मांडले आहेत. त्यावरुन व इतर ऐतिहासिक संदर्भ साधनांवरुन पुढिल ठोस निष्कर्श सांगता  येतील.

  • * छत्रपती शिवाजी महाराजांची उंची साडे पाच ते सहा फूट होती. :-छत्रपती शिवरायांचे दैनंदिन राहणीमान अत्यंत साधेपणाचे होते. त्यांचा दैनंदिन पोशाख हा त्याकाळातील सर्वसामान्य लोकांप्रमाणेच  साधेपणाचा होता.

  • * छत्रपती शिवराय हे संपुर्ण जीवनभर निर्व्यसनी होते.

  • * छत्रपती शिवराय हे दिवसातून एकच वेळ जेवन करीत  असत.

  • * मोहिमांच्या वेळी कसल्याही प्रकारचा डामडौल नसे. ते फक्त दोन तंबू असत. 1664 च्या सुरतेच्या मोहिमेत तर राजे तंबू शिवाय  एका झाडाखाली बसलेले आढळतात.

  • * छत्रपती शिवरायांचा दरबारी पोशाख मात्र लक्षवेदी असे. त्यामध्ये शुभ्र पार्श्‍वभुमीवरील वस्त्रांवर फुलाफुलांंचा चिटाचा चोळणा, डाव्या खांद्यावर सोनेरी भरतकाम केलेले चढाव,सोनेरी शिरपेच त्यावरील हिरेजडित तुरा,काळे पीस आणि शुभ्र मोती राजांच्या शिरपेचाच्या विशिष्ठ आकारावरुन राजे सहज ओळखू येत. राजांच्या डाव्या हातात लांब आणि सरळ अशी बहुदा भवानी तलवार आणि उजव्या हातात डाव्या बाजूला खोचलेली कट्यार असा असे.

  • * छत्रपती शिवरायांच्या चेहर्‍याचे वर्णन असे, काळ्या दाढीमिश्या, बाजूंचे  केस लांब, डोळे मोठे व तेजस्वी, नजर अत्यंत भेदक व सावध, बोलताना स्मितहास्य करीत संवाद साधण्याची खुबी. रंगाने गोरे.

  • * छत्रपती शिवरायांच्या उंचीच्या मानाने हातांची लांबी नजरेत  भरणारी.  

  • * राज्याभिषेक प्रसंगी वजन 140 इंच 1/2  पौंड म्हणजे सरासरी 70  ते 72 किलो.

  • * आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काटकसर हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा  विशेष गुण होता.   अशा या राजा होण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्वाचे धनी असणार्‍या शिवरायांवर कराची पाकिस्तान येथिल कवी   रत्नसूरी यांनी काशीराव बापूजी देशमुख लिखित ‘मराठा क्षत्रियांचा  इतिहास’ या ग्रंथात समाविष्ठ असणार्‍या गज्जलमधील काही ओळी द्वारे छत्रपती शिवरायांचा गौरव करुन माझ्या लेखणीला स्वल्पविराम   देतो.


अटकेत सिंधूतीरी, घटकेत वंग घेरी,

झटकोनि दिल्ली सारी,दख्खनात मीरवी जो ॥ रे दख्खनात मीरवी  जो ॥

आदर्श हा मराठा, राष्ट्रीय- साठा, दैन्यासि देई फाटा, कवि रत्नसूरी गातो ॥

रे कवि रत्नसुरी गातो ॥ जय जिजाऊ !! जय शिवराय !!!

Post a Comment

0 Comments