पंढरपूर लाईव्हश्याम सावजीढमा ढमा करून दिमड्या वाजायला लागल्या कि लक्षात यायचे कि होळी जवळ आलीय . आमच्या गल्लीतला परटाचा आबा दिमडी खूप झकास वाजवायचा .गीडगी नांग गीडगी नांग करून चौकात उभा राहून तो दिमडीवर ठेका धरायचा आणि आम्ही गल्लीवाले मित्र घराबाहेर येउन त्याच्या भोवती घोळका करायचो . मला मात्र आयुष्यात दिमडी तालात वाजवायला कधीच जमली नाही . तेंव्हा बाजारात कातड्याच्या दिमड्या होळीच्या आधी दहा ते पंधरा दिवस यायच्या . आता फायबरच्या छोट्या डफल्या किंवा ढोलक्याच मुले जास्त खरेदी करत आहेत . नव्या पेठेत आणि भादुले पुतळ्याजवळ या दिमड्यांचा बाजार भरायचा . या दिमड्यावर चित्रपटांची नावे लिहिलेली असायची . " सरगम " चित्रपट गाजला तेंव्हा त्यातल्या नायकाच्या हातात डफली असल्याने " सरगम " नाव लिहिलेल्या दिमड्याना त्या वर्षी खूप मागणी होती . आणि ती दिमडी वाजवताना जोतो स्वतःला " सरगम " चित्रपटातला ऋषी कपुराच समजायचा .कडब्यातल्या काड्या आणून त्यांना पुढे डाम्बरांचे मोठे गोळे आम्ही लावायचो आणि त्या काड्यांच्या सहाय्याने आम्ही दिमड्या वाजवायचो . दिमडीचे कातडे पोळंवल्यावर ती जास्त चांगली वाजते असे काही जणांनी सांगितल्याने आम्ही मुले घरातून कागदे आणि काडेपेट्या पळवून आणायचो आणि मधून मधून आपापली दिमडी तापवायचो .
आमच्या गल्लीची होळी जिथे पेटायची तिथे रस्त्याच्या कडेला एक उभा दगड होता म्हणजे अजूनही आहे . तो दगड होळीच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी आमच्या गल्लीतले श्रीधर तात्या शेंदाराने रंगवायचे . होळी पेटवण्यापुर्वी ह्या शेंदूर फसलेल्या दगडाची विधिवत पूजा केली जायची , त्याला हार घालून त्याच्या समोर नारळ फोडला जायचा . श्रीधर तात्या वारल्यापासून या दगडाला शेंदूर लागलेला नाही किंवा त्याची पूजा करण्याचाही कुणी प्रयत्न केला नाही . आता त्या जागी होळीच होत नाही.
आमच्या गल्लीतल्या होळीला आमच्या घरून एक मोठे ओंडके विकत घेऊन देण्याची पद्धत होती . एका बैल गाडीतून हे ओंडके लाकडाच्या अड्ड्यातून आणले जायचे . ओंडके आमच्या तर्फे दिले जाणार असल्याने या बैल गाडीत बसण्याचा माझा रुबाब असायचा . ज्ञानेश्वर मंडपाच्या जवळ आताच्या शहाणे सराफांच्या घरासमोर त्यावेळी माळी यांचा लाकडाचा अड्डा होता . फेटा बांधलेले एक पैलवान गृहस्थ या अड्ड्याचे मालक होते . या अड्ड्यात गेल्यावर सगळीकडे लाकडाचा वास भरून उरलेला असायचा . गल्लीतली तरुण मुले एक मोठाले ओंडके निवडून बैलगाडीत टाकायची आणि आमची बैलगाडी ते घेऊन होळीच्या जागेवर यायची . तो पर्यंत सडा रांगोळी करून होळीची जागा महिलांनी सजवलेली असायची . त्या जागी तो मोठा ओंडका स्थापन करून त्याच्या भोवती इतर लहान मोठी लाकडे आणि गव-या रचल्या जायच्या . मग रीतसर पूजा अर्चा करून होळी पेटवली जायची आणि तोंडावर पालथी मुठ आपटत बेंबीच्या देठापासून बोम्बलायचा कार्यक्रम सुरु व्हायचा तो अगदी रात्रीचे दहा अकरा वाजे पर्यंत चालायचा . सुरुवातीला लाजत लाजत बोंब ठोकणारा मी नंतर नंतर मित्रांच्या संगतीने जोरात बोंब ठोकायचो ..दिमड्यांचा गोंगाट टिपेला पोहोचायचा . होळीच्या ज्वाला उंचावरच्या लाइटच्या तारांना स्पर्श करायचा प्रयत्न करायच्या . मधुनच आम्ही गल्लीतली मुले सायकलवर किंवा पायी जाऊन गावातल्या जवळपासच्या होळ्या बघून यायचो .
रात्री होळीसमोर चिवडा केला जायचा . त्यावर सगळे ताव मारायचे . त्यावेळी घरांना संडासाचे दरवाजे बाहेरच्या बाजूने असायचे आणि हे दरवाजे सहज निघायचे त्यामुळे होळीच्या काळात हे दरवाजे हमखास रात्री उशिरा पळवून नेउन होळीत टाकले जायचे त्यामुळे रात्री प्रत्येक घरातले काही जण आपापल्या दारात झोपायचे . आमच्या घरच्यांसोबत मी हि घराबाहेर झोपायचो . अंथरुणावर पडल्या पडल्या होळीच्या ज्वाला दिसायच्या . अधून मधून कुणीतरी त्यात मीठ टाकायचा आणि त्यामुळे त्याचा चर्र असा आवाज व्हायचा लांब कुठेतरी कुणा उत्साही व्यक्तिमत्वाने ठोकलेली बोंब ऐकू यायची हे सगळे ऐकत ऐकत आणि बघत बघत डोळा लागायचा .
सकाळी जाग यायची तेंव्हा होळीच्या धूमा-यावर भांडी ठेऊन गल्लीवाले आंघोळीसाठी पाणी तापवत असायचे . आमच्या हि घरी ते पाणी आणले जायचे आणि ते पाणी आंघोळ करताना काही वेगळेच वाटायचे ...............................श्याम सावजी ..............पंढरपूर
***
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 4 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 69 हजार 567 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 951 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...


















0 Comments