आषाढीमध्ये भाविकांची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घ्यावी- प्रांतधिकारी- संजय तेली



आषाढीमध्ये भाविकांची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घ्यावी- प्रांतधिकारी- संजय तेली
        
पंढरपूर दि.15:  लाखो  भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या विठठ्लाची यात्रा आषाढी एकादशी 27 जुलै रोजी येत आहे. या यात्रेत  भाविकांची  गैरसोय होणार नाही. याची संबधीत विभागाने आत्तापासूनच दक्षता घ्यावी असे आदेश प्रांतधिकारी संजय तेली यांनी  दिले.
               आषाढी यात्रेनिमित्त प्रशासनातर्फे करण्यात येणा-या तयारीचा आढावा प्रांत कार्यालयातील सांस्कृतीक भवन येथे घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी  मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, उप-अधिक्षक उत्पादन शुल्क रविकिरण कोले, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव, तहसिलदार गजानन गुरव, न.पा.मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, तालुका पोलिस निरिक्षक दयानंद गावडे, प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.पट्टनशेट्टी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
                श्री. तेली म्हणाले की, खादी ग्रामोद्योगच्या इमारती मध्ये कंट्रोल रुम सुरु करण्यात येणार आहे. सरगम चौक येथील रेल्वे पुलाखाली जमा होणा-या पाण्याचा उपसा होण्यासाठी न.पा ने अतिरिक्त विद्यूत मोटारी लावाव्यात. त्याचबरोबर शहर व शहराबाहेरील अतिक्रमणे काढण्यात यावीत. तसेच पालखी  तळावर चिखल निर्माण होणार नाही याची दक्षता संबंधीत विभागाने घ्यावी अशी सुचनाही त्यांनी केली.
          
     न.पा. प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती देताना श्री.गोरे यांनी सांगितले की, यात्रा कालावधी  पुर्वीच पंढरपूर नगर पालिकेतर्फे स्वच्छता विषयक कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर वाखरी ते गोपाळपूर या भागात पाण्याच्या संदर्भांत कोणतेही अडचण येणार नाही. शहरातील सुमारे 113 धोकादायक इमारतींना नोटीसा देण्यात आल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.
              यात्रा कालावधीत आरोग्य विभागाला अतिरिक्त वैद्यकीय स्टाफ मिळावा अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बोधले यांनी केली.  एस.टी. महामंडळातर्फे आषाढीसाठी 921 गाड्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एस.टीचे धत्तुरगांवकर यांनी सांगितले तर तालुका पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांनी पालखीमध्ये सामील असलेल्या  पाण्याचे टँकर अथवा ट्रॅक्टर चालकाचे नांव तसेच मोबाईल नंबर पोलिस कर्मचा-यांना दिसेल अशा दर्शनी भागात लावावेत अशी सुचना केली.            
            या बैठकीत आरोग्य, पाणी, विद्युत विभाग, बी.एस.एन.एल, एस.टी, पोलिस प्रशासन, आर.टी.ओ, अन्न-औषध प्रशासन आदी विभागांचा  प्रांतधिका-यांनी तपशिलवार आढावा घेतला. या बैठकीसाठी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.            
                                000000
बागवान/गरगडे

Post a Comment

0 Comments