२६ जून २०१५
उच्च शिक्षणात खाजगी विद्यापीठे मोठी भूमिका बजावू शकतात: राष्ट्रपती
‘आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे आपण पाहतो तेव्हा लक्षात येते की ती व्यक्तिगत प्रयत्नातून उभी राहिली आहेत. राष्ट्राच्या उभारणीमध्ये अशी विद्यापीठे महत्वपूर्ण भूमिका बजावतात. शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला करण्यासाठी कुलगुरू, कुलपती यांनी प्रयत्न करायला हवेत’, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज पुण्यात केले.
पुण्यातील भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘मुंबई, कोलकाता, मद्रास विद्यापीठांनी भारतातील आधुनिक शिक्षणाचा पाया घातला. तक्षशीला, नालंदा विद्यापीठांची आपली परंपरा आहे. ती जपण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशातील नाव पुढे आणण्यासाठी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जग वेगाने बदलत आहे. आपण ‘ग्लोबल व्हिलेज’ मध्ये राहत आहोत हे सत्य आपण नाकारू शकत नाही. या गतीत सामील होण्यासाठी शोध, संशोधन यावर लक्ष केंद्रित करून सर्वसमावेशक दृष्टी बाळगायला हवी. जगामध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशाकडे आहे; काम करू शकणारी शक्ती आपल्याकडे आहे त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करून घेण्यासाठी कौशल्य शिक्षणाचे २०३० चे आपले ध्येय सर्वांनी उचलून धरायला हवे, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम, विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजी कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

0 Comments