पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 24 ऑक्टोबर 2015
पंढरपूर शहरातील नविन कराड नाका (प्रबोधनकार ठाकरे चौक) ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक (के.बी. पी. चौक) या प्रमुख दोन चौकांना जोडणारा लिंक रोड (व्हीआयपी मार्ग) या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून या मार्गावर अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. आज सकाळच्या सुमारास याच मार्गावर एका दुचाकीस्वाराची पाठीमागून धडक बसल्यामुळे येथील शासकीय वसाहतीमधील एका 82 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यु झाला असून या अपघातात दुचाकीवरील तरुण सुध्दा गंभीर जखमी झालेला आहे. गेल्या 13 ऑक्टोबरलाही एका चार चाकी वाहनाने समोरासमोर धडक दिल्याने एका जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यु झाला होता. आजच्या घटनेमुळे उपनगरातील नागरिक संतप्त झाले असून या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत तर यासाठी लवकरच आंदोलन उभे करणार असल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना अनेक नागरिकांनी दिली आहे.
पंढरपूर लाईव्ह ने लिंकरोड वरील वारंवार होणार्या अपघाताबाबत प्रसिध्द केलेले यापूर्वीचे व्हिडीओ वृत्त बघा.....
आज घडलेल्या अपघाताबाबतची सविस्तर माहिती अशी की, लिंक रोडवरील जलशुध्दीकरण केंद्रासमोरील गारवा हॉटेल जवळून येथील के.बी.पी. कॉलेज मागील शासकीय वसाहत येथील रहिवाशी शंकर लक्ष्मण हरीदास (वय-82) हे आपले घराकडे जात असताना त्यांना पाठीमागून आलेल्या हिरो सीबीझेड (एमएच-13 बीके-9911) मोटारसायकलस्वार ओंकार विश्वास यादव याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात हरीदास हे जागीच मृत्यु पावले असून ओंकार विश्वास यादव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याचेवर येथील जनकल्याण हॉस्पिटल येथे उपचार चालु आहेत. याबाबत ची फिर्याद गंगाधर रामचंद्र कुलकर्णी यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली असून या घटनेबाबतचा अधिक तपास पीएसआय कदम हे करत आहेत.
हा अपघात झाला या ठिकाणचे वळण हे अत्यंत धोकादायक असून या ठिकाणाहून भरधाव वेगात होणार्या अवजड वाहतुकीमुळे पादचार्यांना अथवा दुचाकीस्वारांना येथून प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याचे रुंदीकरण होऊन आवश्यक तेथे झेब्रा क्रॉसिंग होणे अत्यावश्यक आहे.
13 ऑक्टोबर रोजी 72 वर्षीय ज्ञानेश्वर पवार यांचे अपघाती निधनानंतर दुसर्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु खेदजनक....
13 ऑक्टोबर 2015 रोजी सुध्दा याच लिंकरोडवर याच ठिकाणच्या आसपास लिंकरोडवर वास्तव्यास असणारे ज्ञानेश्वर बाबुराव पवार यांनाही आापल्या घराकडे जात असताना समोरुन येणार्या एका चार चाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचाही जाग्यावरच करुण अंत झाला होता. ज्ञानेश्वर पवार हे या भागातील एक प्रतिष्ठीत नागरिक होते. नुकतेच पॅरेलेसिसच्या आजारातून ते बरे झाले होते. त्यांचे कुटूंबिय यामुळे आनंदात होते. मात्र अचानक घडलेल्या त्यांच्या अपघाती निधनाने क्षणात होत्याचे नव्हते झाले.... ज्ञानेश्वर पवार यांचे कुटूंबिय मुकेश ज्ञानेश्वर पवार (बी.ई. सिव्हील). रमेश ज्ञानेश्वर पवार (बी.ए. एमएस) ही दोन मुले व मुलगी सौ.मनिषा गणेश सुर्यवंशी (बीएससी. बीएड) हे सर्वजण अद्यापही आपल्या वडीलांच्या अपघाती निधनाच्या धक्क्यातून पूरेसे सावरलेले नाहीत. ज्ञानेश्वर पवार यांच्या अपघाती निधनानंतर पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी स्वत: पवार यांचे घरी जावून या अपघाताबाबत अधिक माहिती घेतली होती. त्यावेळी उपनगरातील बर्याच जेष्ठ नागरिक मंडळींनी लिंकरोडवर वारंवार घडणार्या अपघाताबाबत नाराजी व्यक्त करत असे अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती. पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज पुन्हा एका वयोवृध्द जेष्ठ नागरिकाच्या लिंकरोडवरील अपघाती करुण अंतामुळे उपनगरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून ही घटना अतिशय खेदजनक अशी आहे.
पंढरपूर लाईव्ह ने लिंकरोड वरील वारंवार होणार्या अपघाताबाबत प्रसिध्द केलेले यापूर्वीचे व्हिडीओ वृत्त बघा.....
_______________









0 Comments