सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान करणार ‘क्रांतीविर वसंतदादा बडवे हिंदुमहासभा प्रोत्साहन मंडळाची घोषणा‘

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-  पंढरपूर दि.16 ऑक्टोबर 2015

             
   पंढरपूर येथील
क्रांतीविर वसंतदादा बडवे हिंदुसभा प्रोत्साहन मंडळाचे वतीने व प्रतिवर्षी देण्यात येणारा क्रांतीविर वसंतदादा बडवे हिंदुशौर्य पुरस्कार सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांना देणार असल्याची माहिती हिंदुमहासभा नेते अभयसिंह कुलकर्णी इचगावकर यांनी दिली.

                   हिंदुत्वाच्या लढाईत विशेष कार्य करणार्‍या लढाऊ व्यक्तीस प्रतिवर्षी समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.  क्रांतीविर बडवे हे पंढरीचे भुषण होते. ते स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीकारक होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य हिंदुत्वासाठी खर्च केले. त्यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. रोख 11 हजार रु., मानपत्र, शाल, पुष्पहार, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असते. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर क्रांतीविर बडवे पुतळा येथे हा पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम होत असतो.  अशी माहिती पंढरपूर लाईव्ह कडे प्रसिध्दीस आलेल्या एका प्रेसनोटमध्ये नमुद आहे.
                         या प्रेस नोटमध्ये पुढे असा उल्लेख केलेला आहे की, सध्या सनातन संस्थेविरुध्द व हिंदुत्वाविरोधात मोठे काहूर उठले असून  सनातन संस्थेला संपविण्याचा व संस्थेवर बंदी घालण्याचा विडा उचलल्याप्रमाणे तथाकथीत पुरोगामी मंडळी प्रचार करीत आहेत. अशा कठीण परिस्थितीत अभय वर्तक यांनी माध्यमांसमोर व जनतेसमोर सनातन संस्थेची व हिंदुत्वनिष्ठांची बाजु ठामपणे मांडली व शाम मानव सारख्या मंडळींचा दांभिकपणा उघड केला. त्यानिमित्ताने सनातन संस्थेची व हिंदु समाजाची खरी बाजु जनतेसमोर आली. या लढाऊ कार्याबाबत त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
                        यापूर्वी हा पुरस्कार क्रुरकर्मा औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण करणार्‍याविरुध्द लढा देणारे मिलींद एकबोटे, हिंदुत्वासाठी कार्यरत असणारे सनातन प्रभात धुळे येथील प्रखर हिंदुत्ववादी व हिंदु एकता

आंदोलनाचे नेते हिरामणआप्पा गवळी, मिरज येथील अफजलखान वधाच्या कमानीचा लढा लढलेले विकास सुर्यवंशी, जातीय हिंसाचार कायद्याचे भीषण वास्तव मांडणारे सुप्रसिध्द लेखक समीर दरेकर, देशभर गाजलेले कर्नाटकचे  श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक, आवरण या कादंबरीद्वारा हिंदुत्व विरोधकांना चोख प्रत्युत्तर देणारे सुप्रसिध्द कन्नड लेखक एस.एल. भैराप्पा, वारकर्‍यात हिंदुत्वाचा प्रचार करणारे विषारी डाऊ कंपनीला पळवून लावणारे लढाऊ नेते ह.भ.प. बंडातात्या कराडकर, जालना येथील लढाऊ आर्यसमाजी नेते महाराणा ब्रिगेडचे संस्थापक बनसिंह  चौधरी अशा हिंदुत्वासाठी लढणार्‍या व्यक्ती व  संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या नामावलीत अभय वर्तक यांना देण्यात येणारा पुरस्कार सुयोग्य व कालोचित आहे.
                         हा पुरस्कार प्रदानाचा समारंभ पंढरीतील रुक्मिणी पटांगणात दि. 19 ऑक्टोबर रोजी पंढरपूरच्या प्रथम नागरिक सौ.साधनाताई भोसले यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रांतीविर ट्रस्टचे उपाध्यक्ष महेश खिस्ते, सचिव विवेक बेणारे, नगरसेविका सौ.वैषणवी बेणारे यांनी केले आहे.

______





 

Post a Comment

0 Comments