पंढरपूर लाईव्ह
आरोग्य
विभागामार्फत राज्यात २ ते १७ ऑक्टोबर
पर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा केला जात आहे. या पंधरवड्यात प्रबोधन आणि
जनजागृतीचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले. कुष्ठरोग हा इतर रोगांपेक्षा थोडा
वेगळा आजार असून लवकर निदान व योग्य उपाय-योजना करुन रोग बरा करणे शक्य आहे. या
रोगासाठी पोलिओ किंवा देवी सारखी प्रभावी लस उपलब्ध नसल्याने पुढील कांही वर्षे
तरी हा रोग समाजात आढळून येत राहील. बहुविध उपचार पध्दतीचा वापर करुन हा रोग
आटोक्यात येवू शकतो.
कुष्ठरोग
हा जंतुमुळे होणाऱ्या इतर रोगासारखाच असला तरी काही वेशिष्ट्यामुळे तो इतर
रोगापेक्षा वेगळा आहे. सन १८७३ मध्ये डॉ. हॅन्सन यांनी " मायक्रो बॅक्टेरियम
लेप्रे" या कुष्ठरोग जंतुचा शोध लावला. तेंव्हा एका रोग जंतुशी निगडित
झालेल्या कुष्ठरोग हा पहिलाच मानवी रोग ठरला. कुष्ठरोग हा सर्व आजारासारखाच जंतुजन्य आजार
असून तो मायक्रो बॅक्टेरियम लेप्रे या जंतुमुळे होतो. देवीच्या शापामुळे किंवा पूर्व जन्माच्या
पापामुळे हा आजार होतो हा गैसमज आहे. आरोग्य शिक्षण व प्रभावी प्रसार माध्यमांचा
वापर करुन या रोगाबाबतचे गैरसमज दूर केले जात आहेत.
हातपायाचे
मज्जातंतू जाड व दुखणे होणे, भुवयांचे केस विरळ होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे,
तळहात व तळपायाला बधिरता येणे, त्वचा तेलकट व चकाकणारी दिसणे, त्वचेवर न खाजवणारा
न दुखणारा बधिर चट्टा येतो. जवळच्या मज्जा तंतुचा दाह होऊन ती सुजते व दुखते तसेच
ज्या भागाला संवेदना पुरवते त्या
भागातील संवेदना नष्ट होतात. तो भाग बधिर होतो. त्या भागाचे कार्य मंदावून
दूर्लक्ष केल्यास त्या भागाचे कार्य संपूर्णत: थांबते. पाच किंवा पाच पेक्षा कमी
बधिर चट्टे असलेला व एकच मज्जा बाधित झालेला रुग्ण हा असांसर्गिक म्हणून ओळखला
जातो. त्यास झई रुग्ण असे संबोधतात. पाच पेक्षा अधिक चट्टे व दोन किंवा अधिक मज्जा
बाधित असलेला रुग्ण सांसर्गिक म्हणून
ओळखला जातो. या रुग्णांच्या शरीरात सांसर्गिक रुग्णापेक्षा कुष्ठ जंतुची संख्या
कमी असते. तसेच हेच रुग्ण कुष्ठरोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असतात.
कुष्ठरोगावरील
उपचारामध्ये डॅप्सोन हे औषध दिले जाते. जेंव्हा हे औषध नव्याने वापरात आले त्या
वेळी त्याची परिणामकता उत्तम होती. पण काहीं वर्षामध्ये डॅप्सोन प्रतिकार जिवाणू
आढळल्यानंतर बहु उपचार पद्धती वापरण्यात येऊ लागली. या उपचार पद्धतीचे लघुरूप
एमडीटी (मल्टि ड्र्ग थेरपी) असे आहे. एमडीटी मध्ये डॅप्सोन, रिफांपिन (रिफंमिसिन) आणि क्लोफॅझिमिन (लॅम्प्रीन) या तीन जिवाणूप्रतिबंधक
औषधांचा उपयोग करण्यात येतो. एमबी कुष्ठरोगावर तीनही औषधे देण्यात येतात. पीबी
कुष्ठरोगावर मात्र फक्त रिफांपिन आणि डॅप्सोनचा वापर करण्यात येतो. तीन
महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णाचा संसर्ग कमी व्हायला लागतो.
आता
बहुविध ओषधोपचार पध्दतीमुळे असांसर्गिक कुष्ठरोग्यास सहा महिने व सांसर्गिक कुष्ठ
रोग्यास बारा महिने नियमित बहुविध ओषोधोपचार देतात व त्यामुळे कुष्ठरुग्ण बरा तर
होतोच शिवाय कुष्ठरुग्णास विकृती येत
नाही. त्यामुळे त्याला सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे जीवनमान जगता येते. महाराष्ट्रात
बहुविध औषधोपचार पध्दती सुरु करण्यात आली असून शासकीय दवाखाण्यामध्ये कुष्ठरोगांवर
मोफत उपचार केले जातात.
- एकनाथ पोवार
माहिती सहाय्यक (उप माहिती कार्यालय, पंढरपूर.)








0 Comments