मंदिर प्रशासनात एकवाक्यता नसल्याने भजनी मंडळास विठ्ठल मंदिरात प्रवेश करताना त्रास .... दखल घेण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-  पंढरपूर दि.16 ऑक्टोबर 2015

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात नवरात्र महोत्सवानिमित्त स्थानिक व परगावच्या भजनी मंडळाच्या वतीने संगीत भजनाची सेवा समर्पीत केली जात असते.परंपरेप्रमाणे भजनी मंडळाच्या सदस्यांना भजन साहित्यासह व्हि.आय.पी.गेटमधून प्रवेश दिला जात असे.मात्र यंदा समिती प्रशासनात एकवाक्यता नसल्याने भजनी मंडळातील सदस्यांना आपल्या साहित्यासह प्रवेशासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तरी प्रशासनाने याची त्वरीत दखल घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.अशी माहीती कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे  यांनी पंढरपूर लाईव्ह कडे पाठविलेल्या एका प्रेस नोट मध्ये दिली आहे.

             वास्तविक पाहता भजनी मंडळातील सदस्यांना व्हि.आय.पी.गेटमधून प्रवेश दिला जावा अशा सुचना
             कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या असतानाही या गेटमधुन न सोडता नामदेव पायरी येथून प्रवेश करावा असे सांगीतले जाते.तेथे गेल्यानंतर तेथील सुरक्षा कर्मचार्‍यांकडुन अडवणुक केली जात असून आम्हास आदेश नाहीत.विचारून मग सोडतो अशा प्रकारची अडवणुक केली जाते.भजन साहित्य घेवून आलेल्या भजनी मंडळात अनेक वृध्द महिलांचाही समावेश असतो.त्यांना तेथे ताटकळत थांवावे लागत असल्याचे दुदैवी चित्र दिसून येत आहे.तर अनेक वृध्दांना नामदेव पायरी नजिकच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍या चढण्यास त्रास होत आहे.त्यामुळे भाविकात मंदीर प्रशासनाबाबत चिड निर्माण झाली आहे.
     तरी या प्रकाराची दखल घेवून आपली सेवा बजावण्यासाठी आलेल्या भजनी मंडळातील सदस्यांना पुर्वीप्रमाणे व्हि.आय.पी.गेटमधुन सोडले जावे अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर महिला मंडळाच्या प्रतिनिधी अनुराधा वरुडकर,शहर कॉग्रेेसचे अध्यक्ष सुहास भाळवणकर,भगिरथ म्हणाणे,रियाज शेख,सुनंदा भाळवणकर आदींच्या सह्या आहेत.

______




 

Post a Comment

0 Comments