पुण्या-मुंबई तील जातीयवादी बिल्डरांचे लोण पंढरीत.... एका मोठ्या गृहप्रकल्पात ‘जात’ पाहून घराचे बुकींग होत असल्याच्या चर्चेने पंढरीत खळबळ...!

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 

पुण्या-मुंबईकडील कांही बडे बिल्डर त्यांच्या गृहप्रकल्पांमध्ये एका विशिष्ट धर्माच्या लोकांसाठीच गृहप्रकल्प उभे करुन पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीय सलोखा बिघडविण्याचे कुकर्म करत असल्याची चर्चा मध्यंतरी चांगलीच गाजली होती. विविध स्तरातून याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला गेला. पुण्या-मुंबईकडील हेच कांही जातीयवादी बिल्डरांचे लोण समानतेचा संदेश अवघ्या जगाला देणार्‍या संतभुमी पंढरीत आल्याची चर्चा असून पंढरपूरमधील सामाजिक कार्यकर्ते गणेश घंटे यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे वाखरी हद्दीत सुरु झालेल्या एका बड्या गृहप्रकल्पात अशा प्रकारचा जातीयवाद केला जात असल्याची माहिती दिली आहे. यामुळे पंढरीच्या बांधकाम क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. 

पंढरपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून शहराच्या आजुबाजुला असणार्‍या ग्रामीण भागातून अनेक

मोठ-मोठ्या बिल्डरांनी विविध नावांने आपापले गृहप्रकल्प उभारण्याचा धडाका लावला आहे. पंढरपूरमधील बांधकाम क्षेत्रातील इतिहास पहाता येथे अनेक नामवंत आर्किटेक्ट, इंजिनिअर्स आणि वास्तुविशारद आहेत. ज्यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे. येथील अनेक आर्किटेक्टस् व इंजिनिअर्सनी पंढरपूरच्या सौंदर्यात भर घालणार्‍या देखण्या इमारती उभा केल्या. मात्र आजतागायत यापैकी कुणीही आपल्या कार्य-कर्तृत्वात जातीयवाद येऊ दिला नाही. उलटपक्षी पंढरपूरमधील अनेकविध धर्माचे इंजिनिअर्स बंधु एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन येथील बांधकाम क्षेत्राला समृध्द करत आहेत. पंढरपूरच्या बाणधकान क्षेत्रातील या महान परंपरेला मात्र पुण्यातील एका बिल्डरकडून घडलेल्या हातीयवादामुळे गालबोट लागले आहे. पंढरपूरच्या बांधकाम क्षेत्रात दिवसेंदिवस होणार्‍या मोठ-मोठ्या उलाढालीमुळे पुण्या-मुंबईकडच्या बिल्डरांची मात्र झोप उडाली. येथील बांधकाम क्षेत्र काबीज करण्यासाठी विविध मार्गाने अनेकांनी येथे जमिनी मिळवल्या. आणि येथील बांधकाम क्षेत्रात शिरकाव केला. मात्र यापैकी कांहीजण मात्र संतांच्या या भुमीत जातीयवादाचे विष पेरत असल्याची चर्चा असून पंढरपुरनजीक वाखरी हद्दीत एका बड्या बिल्डरकडून उभारल्या जात असणार्‍या गृहप्रकल्पामध्ये देण्यात येणारे प्लॉट अथवा फ्लॅट जाती धर्माची चौकशी करून दिले जात असून, याबाबत या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी चौकशीसाठी येणार्‍या ग्राहकांना प्रचंड धक्का बसत असून, सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्यागोविदांने रहात असललेल्या पंढरीनगरीत जात धर्म विचारून प्लॉट अथवा फ्लॅट विक्री केली जात असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-ठाणे परिसरात केवळ मांसाहार करतात किंवा मुस्लिम आहेत म्हणून आपल्या इमारतीमध्ये त्याला फ्लॅट विक्री केला जात नाही अथवा भाड्याने दिला जात नाही. अशा प्रकाराबद्दल पुणे-मुंबई-ठाणे येथील विविध सामाजिक संघटनांनी सदैव आवाज उठविल्याचे दिसून  येते. तर अनेक प्रसंगामध्ये याबाबत न्यायालयीन लढायाही झाल्या आहेत. परंतू पंढरीत कधी असा प्रकार घडला नाही. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत पंढरीत अनेक अपार्टमेंटस उभ्या राहिल्या. अनेक ठिकाणी प्लॉट पाडून जमिनींची विक्री केली गेली. पण गिर्‍हाईकाचे जात विचारण्याचा संकुचितपणा कधीही येथील स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनी दाखविला नव्हता. मात्र केवळ स्वत:च्या व्यवसायाचा विस्तारच मुळी ‘उँचे लोग’ चा नारा देत करणार्‍या व राज्यभरात गृहप्रकल्प राबविणार्‍या एका बड्या बिल्डरने संतांच्या ‘सर्वधर्मसमभाव’ विचारसरणीला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आहे. अशी माहिती गणेश घंटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. पंढरपूर शहरात सर्व समाजबांधव एकोप्याने व भाईचारा बाळगुन आहेत. पंढरपूरकरांना तरी अशा प्रकारचा जातीयवाद नक्कीच आवडणारा नाही हे मात्र निश्‍चित. ही बाब पंढरपूरमध्ये येणार्‍या बाहेरच्या बिल्डरांच्या ध्यानात यावी व यापुढे तरी असा जातीयवाद येथील नागरिकांना प्लॅट अथवा बंगले देताना होऊ नये एवढीच माफक अपेक्षा.
____________________

Post a Comment

0 Comments