पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज :- दि.15 डिसेंबर 2015
पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल माने यांना आज अॅन्टी करप्शन ब्युरो च्या अधिकार्यांनी 10 हजाराची लाच घेताना करकंब मध्येच रंगेहाथ पकडल्याचे वृत्त आहे. भोसे (ता.पंढरपूर) येथील नितीन तळेकर यांनी अॅन्टीकरप्शन विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून अॅन्टीकरप्शन च्या अधिकार्यांनी वरील कारवाई केली.
अनिल माने हे करकंब पोलिस ठाण्यातून बदलून सोलापूर हेडक्वार्टरकडे बदली होऊन जाणार होते आणि आजच ते चार्ज सोडणार होते अशी चर्चा आहे. मात्र आजच अशा प्रकारे त्यांना अटक झाली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, भोसे (क.) येथे जुगार अड्डा चालविणारे कांही आरोपींना स.पो.नि. माने यांनी अटक केलेली होती. तीन पत्तीच्या डावाचा जुगार पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात जोरात चालु असल्याची माहिती मिळताच माने यांनी याठिकाणी छापा टाकून तेथील कांही आरोपींना अटक केलेली होती. मात्र पुढे तडजोड करुन संबंधीत आरोपींना सोडविण्यासाठी नितीन तळेकर यानी माने यांना 10 हजार रुपये देऊ केले ते माने यांनी घेणेचे कबुल केले. मात्र येथेच वासे फिरले... तळेकर यांनी माने यांना पैसे देण्यापूर्वीच याबाबत अॅन्टीकरप्शन ब्युरो कडे तक्रार दाखल केली आणि अॅन्टी करप्शन ब्युरो च्या अधिकार्यांनी करकंब पोलिस ठाण्यात सापळा लावला. आज दुपारी 3:30 ते 4 वाजणेच्या सुमारास करकंब पोलिस ठाणे येथे अनिल माने यांना 10 हजार रुपये दिले. याचवेळी अॅन्टी करप्शन ब्युरो च्या अधिकार्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली.ही घटना समजताच करकंब व परिसरातील अनेक ग्रामस्थांनी पोलिस ठाणे परिसरात मोठी गर्दी केली होती. माने यांना अटक होताच पोलिस ठाणे परिसरात तळेकर यानी फटाके फोडल्याचेही वृत्त आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून माने यांच्या अटकेचे वृत्त सर्वत्र फिरत होते.


0 Comments