पंढरपूर लाईव्ह/ महाराष्ट्र लाईव्ह न्युज : दि.16-12-2015
पंढरपूमधील लिंकरोडवर आज पुन्हा एक अपघात घडला असून एका ट्रकने समोरून येणार्या कारला समोरासमोर जोराची धडक दिल्यामुळे कारमधील तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार चालु आहेत. या अपघातामध्ये कारचा पुढचा भाग चेंदामेंदा झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की आज सकाळी 6:30 वा. येथील लिंक रोडवरील एम.एस.ई. बी कार्यालयासमोर के.बी.पी. चौकाकडून आलेल्या ट्रकने (एम.एच. 12 एच.डी. 5703) नविन कराड नाकाकडून येत असलेल्या एका कारला (एम.एच.13 एस.ई. 5021) जोराची धडक दिली. यावेळी कारमधील बादशजा शेख, हुसेन सफन शेख व निखील संजय भाटे हे तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांचेवर रुग्णालयात उपचार चालु आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक तसाच निघून गेला मात्र येथील नविन कराड नाका चौकामध्ये काहीजणांनी हा ट्रक अडविला. ट्रकचालकाने ट्रक तेथेच सोडून पळ काढला. सदर घटनेत अज्ञान ट्रक चालक आरोपीने निष्काळजीपणे गाडी चालवून समोरासमोर धडक दिली असून कारचे नुकसान झाले असल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी निखील संजय भाटे (रा.चौफाळा, पंढरपूर) यांनी नोंद केली आहे. अज्ञात ट्रकचालक आरोपी फरार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.अपघात टाळण्यासाठी खालील उपाययोजना तातडीने होणे आवश्यक
लिंक रोडवरील अवजड व भरधाव वेगाने होणारी वाहतुक ही नागरिकांसह पोलिसांसाठीही मोठी डोकेदुखी बनल्याचे सद्यस्थितीत तरी चित्र स्पष्ट होत आहे. मागील कराड नाक्यावर झालेल्या अपघाताला आठ दिवस होतात न होतात तोच आज हा दुसरा अपघात घडला आहे. या मार्गावर ज्या ठिकाणी गतीरोधक बसविलेले आहेत त्या गतीरोधकांवर पांढरे पट्टे मारणे व आवश्यक तेथे सुचना फलक लावणे आवश्यक आहे. तसेच येथील नागालॅन्ड चौक, देशमुख पेट्रोल पंप आणि अश्वमेघ हॉटेल समोर सुध्दा गतीेरोधक बसिवणे आवश्यक आहे. पंढरपूरच्या लिंक रोडवरील या उपाययोजना न झाल्यास कांही संघटना जनआंदोलन करण्याच तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती पंढरपूर लाईव्ह च्या सुत्रांना मिळालेली आहे. पोलिस अधिक्षक विरेश प्रभु व पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता श्री. राऊत, उपअभियंता श्री.गावडे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत डोंबाळी, गणेश सिंघण व पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे आदींनी या मार्गावर कोठे कोठे गतीरोधक असावेत याबाबत चर्चा करुन गतीरोधकांचे पॉईंट फिक्स केले होते. मात्र वरील ठिकाणी गतीरोधक अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता श्री.गावडे यांच्याशी संपर्क साधला असता नव्याने नविन कराड नाका परिसरात आणखी दोन गतीरोधक बसविण्यात आले आहेत, तसेच झालेल्या गतीरोधकांवर पांढरे पट्टे मारणे, आवश्यक तेथे सुचना फलक लावणे आदी कामे केली जाणार आहेत. मात्र वरील ठिकाणी आणखी गतीरोधक बसवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शैक्षणीक संस्थाकडे जा-ये करत असतात. येथील क.भा.पा. महाविद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कुल, राजाराम इंग्लिश स्कुल, द.ह. कवठेकर प्रशाला, उमा महाविद्यालय, प्रोग्रेस विद्यालय आदी शैक्षणिक संस्था व मनिषानगर, गाताडे प्लॉट, गोकुळनगर या भागात असणार्या मोठ्या कोचिंग क्लासेस कडे जा-ये करणार्या अनेक विद्यार्थ्यांना, वयोवृध्दांना वरील ठिकाणे धोकादायक बनलेली आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांच्या स्कुल बसेस या देशमुख पंप, अश्वमेघ चौक (पाण्याच्या टाकीजवळ) व नागालॅन्ड चौक या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेण्यासाठी व सोडण्यासाठी थांबतात. त्यामुळे वरील सर्व ठिकाणी गतीरोधक तातडीने बसविणे आवश्यक आहे. तसेच नविन कराड नाका चौक (प्रबोधनकार ठाकरे चौक) व क.भा.पा. कॉलेज चौक (क्रांतीसिंह नाना पाटील चौक) या ठिकाणी ‘‘लिंकरोड हा मार्ग रहदारीचा असल्यामुळे लिंक रोडवरुन आपल्या वाहनांचा वेग मर्यादीत ठेवावा, वाहने सावकाश हाका) असे ठळकपणे दिसून येणारे मोठे फलक लावणे आवश्यक आहे.’’ अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणेबाबतही लवकरात लवकर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र तत्पूर्वी वरील गोष्टी तातडीने केल्यास वारंवार होणार्या अपघातांना निश्चितच कांही प्रमाणात पायबंद बसेल.

0 Comments