मुंबई : राम मंदिर उभारणीचे कार्य होती घेतलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला चार चाँद लागतील, असं मत शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्रातून व्यक्त केलं आहे. देशात फक्त अल्पसंख्याक समाजाकडेच लक्ष दिलं जातं, असं नसून बहुसंख्य हिंदू समाजाचाही आवाज ऐकला जातो हे दाखवून देण्यासाठी राममंदिर उभं राहायला हवं, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात लोकप्रिय आहेत. कारण देशातल्या बहुसंख्य हिंदू समाजाने त्यांना नेतृत्व बहाल केलं आहे. संपूर्ण बहुमताचं 280 खासदारांचं सरकार त्यांच्या हाताशी आहे. म्हणूनच सरसंघचालकांच्या राममंदिराच्या मागणीचे महत्त्व जास्त आहे. राममंदिर आता नाही तर कधीच नाही.’ अशा शब्दांत मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 380 खासदार आल्यावर राममंदिर उभारण्याचं म्हटलं होतं, पण फक्त दोन खासदार असताना भाजपने अयोध्येत रणकंदन केलं. बाबर हा येथील मुसलमानांचा कोणी लागत नाही, तसा सरकारचाही कोणी लागत नाही. हा श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धेच्या बाबतीत न्यायालयाला निवाडा करता येणार नाही.’ असं ‘सामना’त म्हटलं आहे.


0 Comments