| ||
| मुंबई : महाराष्ट्र झोपडपट्टी मुक्त करण्याचे शासनाचे उद्दीष्ट असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आज येथे सांगितले. जोगेश्वरी येथील झोपडपट्टीवासियांशी शुक्रवारी गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी भेट देऊन सर्व झोपडपट्टीवासीयांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बायोमेट्रीक सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ श्री.वायकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता, एसआरएचे सचिव शंकरराव भिसे, अप्पर जिल्हाधिकारी अतिक्रमण व निष्काषण विभाग रिलाल सोनावणे, अप्पर जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार रमेश लटके, आमदार तृप्ती सावंत, नगरसेवक बाळ नर, नगरसेविका मंजिरी परब, नगरसेवक अंबुरे, नगरसेवक जितेंद्र वळवी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री.वायकर म्हणाले, बायोमेट्रीक सर्वेक्षण पद्धतीच्या सहाय्याने झोपडपट्टी पुनर्वसन अधिकाराअंतर्गत (एसआरए) राबविण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणाच्या कामाला गती देऊन जोगेश्वरीतील कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. येत्या चार वर्षात जोगेश्वरी झोपडपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न आहे. या अत्याधुनिक पाहणी पद्धतीमुळे ही योजना पारदर्शक होणार असून, आर.ए. अंतर्गत गावठाण जागेवरील आदिवासी व कोळी बांधवांनाही हक्काचा निवारा मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. केंद्राच्या 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार असून, संपूर्ण मुंबईचे सर्वेक्षण 6 महिन्यात तर जोगेश्वरीचे सर्वेक्षण पुढील एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिकांनी आणि जनतेने सर्वेक्षणावेळी शासकीय कर्मचाऱ्यांना खरी माहिती देऊन त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन राज्यमंत्री श्री. वायकर यांनी केले. | ||

0 Comments