रोहित शर्मा लग्नबंधनात अडकणार!

मुंबई: 2015 या कॅलेंडर वर्षात भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला नवनव्या अध्यायांची जोड लाभली. टीम इंडियानं किंवा टीम इंडियाच्या शिलेदारांनी मैदानावर गाजवलेल्या पराक्रमांनी हे अध्याय समृद्ध झाले आहेत. पण त्याच वेळी 2015 हे भारतीय क्रिकेटवीरांसाठी लगीनघाईचंही वर्ष ठरलं. हे वर्ष मावळतीकडे निघालेलं असताना रोहित शर्माही आपली मैत्रिण रितिका सजदेसोबत लग्नाच्या बंधनात अडकतो आहे.

अजिंक्य रहाणे… सुरेश रैना… आणि हरभजनसिंग यांच्यानंतर टीम इंडियाचा आणखी एक शिलेदार… रोहित शर्माही लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे.

वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या पराक्रमांनी रोहित आज लाखो भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. टीम इंडियातला एक एलिजिबल बॅचलर म्हणून शेकडो तरुणींच्या हृदयातही त्यानं घर केलं होतं. पण त्या साऱ्या तरुणींना क्लीनबोल्ड करून रोहितच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी त्याची वाग्दत्त वधूय रितिका सजदे

रोहित आणि रितिकाची लवस्टोरी म्हटलं तर अगदी ताजी आहे. पण दोघांची फ्रेंडशिप ही तब्बल आठ वर्ष जुनी आहे. गेली सहा वर्ष तर ती रोहितची मॅनेजर म्हणूनच जबाबदारी सांभाळते आहे. याच प्रोफेशनल रिलेशनशिपनं रोहित आणि रितिका फ्रेण्डस म्हणून आणखी जवळ आणलं आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते कदाचित त्या दोघांनाही कळलं नाही.

रितिकाची आणखी ओळख सांगायची तर कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एन्टरटेनमेन्ट या सेलिब्रिटी मॅनेजमेन्ट कंपनीचा मालक बंटी सजदेची ती चुलत बहीण. पण सख्ख्या बहिणीपेक्षा कदाचित अधिक जवळची. बंटीची सख्खी बहिण सीमा खान म्हणजे सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानची पत्नी. सीमापेक्षा बंटीचं रितिकाशी नातं अधिक दृढय, कौटुंबिक आणि व्यावसायिकही. कॉर्नरस्टोन कंपनीच्या पहिल्या दिवसापासूनच बंटीनं सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून तिच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

रोहित आणि रितिकामधलं एक क्रिकेटर आणि एक मॅनेजर हे नातंच इतकं प्रोफेशनल होतं, की सुरुवातीला त्यांच्या सोबतीनं राहण्याची बातमी बनली नव्हती. पण ऑस्ट्रेलियातल्या विश्वचषकाच्या कालावधीत त्यांचं सोबतीनं भटकणं ही मोठी बातमी बनली.

अखेर दिनांक 30 एप्रिल 2015 या दिवशी रोहितनं दोघांमधल्या प्रेमाच्या नात्याला ऑफिशियल स्टेटस दिलं. आपल्या 28व्या वाढदिवसाचं औचित्य साधून, तो रितिकाला घेऊन बोरिवली स्पोर्टस क्लबच्या खेळपट्टीवर गेला. याच मैदानावर रोहित त्याच्या वयाच्या अकराव्या वर्षी पहिली मॅच खेळला होता. त्याच मैदानाच्या खेळपट्टीवर रोहितनं रितिकाला प्रपोज केलं.

रोहितनं प्रपोज करताना दिलेली अंगठी घालूनच, मग रितिकानं त्यांच्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्याच फोटोनं रोहित आणि रितिकाची हृदयं लाईफ पार्टनरशिपसाठी जुळल्याची बातमी पहिल्यांदा जगाला दिली. मुंबईच्या ताज लँड्स इनमध्ये आयोजित विवाहसोहळ्यानं रोहित आणि रितिकामधल्या त्याच लाईफ पार्टनरशिपची सुरुवात होईल

Post a Comment

0 Comments