करकंब रोटरी क्लबने वेगळा ठसा निर्माण केला-डॉ.दीपक पोफळे

करकंब,ता.१३- (गोपीनाथ देशमुख यांजकडून)

करकंब रोटरी क्लबने केवळ सहा महिन्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. गेल्या २५-३० वर्षापासून रखडलेले येथील बसस्थानकाचे काम कोणताही निधी उपलब्ध नसताना रोटरियन्सनी स्वतःच्या ८० हजार रुपये खर्चातून पूर्ण केले आहे. त्यामुळे येथील प्रशासन आणि रोटरी क्लब यांच्या समन्वयातून भविष्यात करकंबचा विकास निश्चित होईल, असे मत रोटरी क्लबचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ.दीपक पोफळे यांनी व्यक्त केले.


       करकंब रोटरी क्लबतर्फे ८० हजार रुपये खर्चून येथील बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज श्री.पोफळे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डिस्ट्रीक्ट सचिव प्रशांत कुलकर्णी, असिस्टंट गव्हर्नर डॉ.प्रशांत कोल्हे, जीएसआर डॉ.सुहास खडके, करकंब रोटरीचे क्लबचे अध्यक्ष डॉ.प्रशांत मोरे, सचिव डॉ.विनोद शिंगटे, पंढरपूर आगाराचे व्यवस्थापक श्री.हिप्पळगावकर, सरपंच आदिनाथ देशमूख, उपसरपंच पती राहूल पूरवत, अभिषेक पूरवत, अनेक ग्रामपंचायत सदस्य, सर्व रोटरीयन्स  व ग्रामस्थ उपस्थित होते.
     यावेळी बोलताना श्री पोफळे यांनी रोटरी क्लबच्या जगभरातील २०० देशांमध्ये जवळपास साठ हजार शाखा असून या माध्यमातून जगातील पोलिओ निर्मूलनाचे केलेले काम हे रोटरीचे सर्वात ठळक काम राहिले आहे. प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर मातृ-पितृ ऋण, गुरु ऋण आणि समाज ऋण फेडावे लागते. यातील समाजऋण फेडण्याचे महत्वपूर्ण काम रोटरीच्या माध्यमातून केले जात असून जास्तीत जास्त लोकांनी रोटरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या दैनंदीन गरजा भागवून राहिलेल्या उत्पन्नापैकी काही भाग समाजसेवेसाठी दिल्यास त्याचा जीवनात निश्चित फायदा होतो, असे त्यांनी सांगितले. डॉ.प्रशांत मोरे यांनी करकंबची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात येथे नगरपालिका होवू शकते याचा विचार करुन येथे विकास कामे झाली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करुन याकामात रोटरीचेही योगदान राहील याची ग्वाही दिली. बसस्थानक नुतनीकरणाच्या कामात सहायक पोलिस निरीक्षक अनिल माने यांनी पोलिस ठाण्याचे पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार त्यांनी मानले. पंढरपूर आगारप्रमूख श्री.हिप्पळगावकर यांनी इथून पुढे सर्व लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या करकंब गावातून जातील याची ग्वाही देवून सर्व आगारांना तशा सुचना देण्याचे मान्य केले. प्रास्ताविक रोटरी क्लबचे सचिव डॉ.विनोद शिंगटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन सूर्यकांत बनकर यांनी केले तर आभार अभिषेक पूरवत यांनी मानले

Post a Comment

0 Comments