पंढरपूर तालुका कोळी महासंघाने दिले माणुसकीचे दर्शन! बेवारस मृतदेहाची थांबवली विटंबना...

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 22 फेब्रुवारी 2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील प्रदक्षिणा मार्गावर दोन दिवसापासून पडलेल्या एका बेवारस मृतदेहाची विटंबना थांबवून पंढरपूर तालुका कोळी महासंघाने माणुसकीचे दर्शन दिले. प्रदक्षिणा मार्गावरील मुक्ताबाई मठाच्या पायरीला लागुनच अंदाजे पंचावन्न वर्ष वय असलेल्या एका बेवारस पुरुषाचा मृतदेह दोन दिवसापासून अस्ताव्यस्त अवस्थेत पडून होता. या मृतदेहाच्या अंगावर पांढर्‍या रंगाचा विजार-शर्ट होता. दोन दिवसापासून पडून असल्याने दुर्गंधी सुटलेली होती. येणारे जाणारे फक्त बघ्याची  भुमिका घेत होते. कुणालाही या मृतदेहाबाबत पोलिसांना कळवावे असे वाटत नव्हते. ही बाब पंढरपूर तालुका कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव यांना समजताच त्यांनी तातडीने याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाणेस माहिती दिली.


पंढरपूर शहर पोलिस या ठिकाणी तातडीने आले. घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून नोंद केली. हा मृतदेह पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी मात्र कोणत्याही प्रशासकीय वाहनाची सुविधा उपलब्ध नसल्याने पांडुरंग सावतराव यांनी खाजगी गाडीची व्यवस्था केली. कोळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हा मृतदेह उचलून या गाडीत ठेवणे व उपजिल्हा रुग्णालयात तो उतरवून घेणेसाठी पोलिसांना सहकार्य केले. सदर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी हा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. यावेळी सोमनाथ नेहतराव, सतीश पाडुळे, आण्णा अटकळे, प्रसाद अधटराव, दत्तात्रय सावतराव, विजय सावतराव, ओंकार कोताळकर, अक्षय अधटराव, देविदास टोमके आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

पंढरपूर शहर हे अध्यात्मीक नगरी असल्याने येथे अनेक मनोरुग्ण व वयोवृध्द कांही अपप्रवृत्तीकडून आणून सोडले जातात. अनेकदा आजारी असलेल्या अशा निराधारांवर उपचारही वेळेत होत नाहीत. अशांचा मृत्यु झाल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देऊन असे मृतदेह शववाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीही जलद सुविधा व यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा मृतदेहांची विटंबना होते. ही बाब माणुसकीला काळीमा फासणारी आहे. ‘‘पंढरपूर शहरात बेवारस, निराधारांच्या आरोग्य सेवेसाठी एखादी स्वतंत्र अ‍ॅम्ब्युलन्स व बेवारस मृतदेहांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी एखादी स्वतंत्र शववाहिका असणे अत्यावश्यक आहे. परंतु याबाबत कोणीही पुढे येत नाही. आज या मृतदेहाची झालेली ही विपन्नावस्था पाहून आमचे मन हळहळले. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दरबारात एखाद्या माणसाची मेल्यानंतरही अशी विटंबना होत असेल तर याला काय म्हणावे?  आम्ही पंढरपूर तालुका कोळी महासंघाच्या वतीने लवकरच यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा उभारुन एक शव वाहिका व एक अ‍ॅम्ब्युलन्स ची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करु.’’ असे मत कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मोहन सावतराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments