नामसंकीर्तन सभागृहामुळे पंढरपूरच्या वैभवात भर - नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील

पंढरपूर LIVE 7 Jun 2018






पंढरपूर, दि.6  :- पंढरपूर वारकरी भाविकांचे माहेर आहे, अध्यात्माचे केंद्र असलेल्या  पंढरपूरात  विकास कामाची गंगा वाहत राहणार आहे. यातच  पंढरपूरात होत असलेले नामसंकीर्तन सभागृह व अन्य विकास कामांमुळे पंढरपूरच्या वैभवात आणखी भर पडणार असून नामसंकीर्तन सभागृह सद् विचारांचे प्रेरणा देणारे केंद्र होईल, असे मत नगरविकास, गृह (शहरे), विधी आणि न्याय, संसदीय कार्य, कौशल्य विकास आणि उद्योजकता व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री  रणजीत पाटील यांनी आज येथे बेालताना व्यक्त केले.
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आयोजित सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत पंढरपूर शहर विस्तारित भागात भुयारी गटार योजनेचा टप्पा क्र. 3,  स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन योजने अंतर्गत विविध विकास कामे, वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत सांगोला रोड व इसबावी येथे प्रत्येकी 10 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे व वितरण नलिका टाकणे  आणि  वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत नामसंर्कीतन सभागृहाचे भूमिपूजन नगरविकास राज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विकास कामांच्या भूमी पूजन कार्यक्रमास  जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय देशमुख, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार प्रशांत परिचारक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक व नागरीक उपस्थित होते
श्री. पाटील म्हणाले, पंढरपूरचे महात्म्य वेगळे आहे, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येणाऱ्यांना नवीन उर्जा मिळते.  दर्शनासाठी  येणाऱ्या लाखो भाविकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. या वारकरी भावीकांना स्वच्छ पाणी, आरोग्य  व अन्य चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासनामार्फत पंढरपूरात अनेक विकास कामे केली जात आहेत. पंढरपूरात विकास कामांची गंगा अशीच चालू राहणार आहे.  पंढरपूर शहराचा अमृत योजनेत जरी समावेश नसला तरी या शहराच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही.
नामसंकीर्तन सभागृहामुळे पंढरपूरच्या वैभवात भर पडणार असून वारकरी संप्रदायाबरोबरच येथील कला रसिकांसाठी नामसंकीर्तन सभागृह पर्वणी ठरणार आहे. राज्य शासनाने नामसंकीर्तन सभागृहासाठी अर्थसंकल्पात           40 कोटीची  तरतूद केली असून 10 कोटी नगरपालिकेस दिले आहेत. नामसंकीर्तन सभागृहाचे काम दर्जेदार व गूणवत्तापूर्ण व्हावे, असे नगरविकास राज्यमंत्री पाटील म्हणाले.
श्री. पाटील म्हणाले, राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी राज्यात कौशल्य विकासाची केंद्रे सुरु करण्यात येत आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने बेरोजगार युवकांसाठी कौशल्य विकासाचे केंद्र सुरु करण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्यास त्यांच्या प्रस्तावास राज्य शासनामार्फत प्राधान्य दिले जाईल.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासाठी राज्य शासनामार्फत भरघोस निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. येथे येणारा वारकरी हा सामान्य असून त्याला सर्व पायाभूत सुविध मिळाव्यात यासाठी शासन अग्रही आहे. त्यामुळेच पंढरपूर क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असल्याचे दिसून येते.  आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री वारीसाठी येणाऱ्या भाविकांना चांगले रस्ते मिळावेत यासाठी पंढरपूरकडे येणारे मुख्य सहा मार्ग राष्ट्रीय महामार्गास जोडण्यात येत असल्याचे पालकमंत्री देशमुख म्हणाले.
यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांत परिचारक यांनी मनोगत व्यक्त केले.  तत्पूर्वी नगरविकास राज्यमंत्री श्री. पाटील यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. 




महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments