श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात फरासखाना चौक, अप्पा बळवंत चौक, सिटी पोस्ट चौक येथील 7 सिग्नलवर थांबणा-या वाहनचालकांसाठी कापडी छप्परची सोय करण्यात आली आहे. याकरीता सुवर्णयुग तरुण मंडळाचे चेतन लोढा, प्रकाश चव्हाण, विनायक रासने, सौरभ रायकर यांसह कार्यकर्त्यांनी सलग तीन दिवस अहोरात्र विशेष परिश्रम घेतले आहेत.
फरासखाना चौकात 60 बाय 40 आणि 50 बाय 30 आकाराच्या हिरव्या कापडाचे छप्पर, अप्पा बळवंत चौकामध्ये 30 बाय 20, 20 बाय 20 आणि 40 बाय 20 आकाराचे छप्पर तसेच सिटी पोस्ट चौकामध्ये 60 बाय 30 आणि 40 बाय 20 आकाराचे छप्पर लावण्यात आले आहे. प्रत्येकी 3 फूट रुंदीचे कापड शिवून त्याद्वारे मोठे छप्पर तयार करण्यात आले आहे. याशिवाय 12 आणि 4 एमएम आकारच्या दो-यांचा वापर करुन हे छप्पर बांधण्यात आले आहे.
हेमंत रासने म्हणाले, पुण्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नलकरीता चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे त्यांच्याकरीता ही सुविधा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला असून त्यांच्या प्रेरणेतून पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पुढील काही दिवसात इतरही चौकात अशी सुविधा देण्यात येणार आहे. कापडी छप्परमुळे उन्हाचे प्रमाण कमी झाले असून रस्ते तापण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
* कापडाचे छप्पर असल्याने आपोआप होतेय वाहतूक नियमांची अंमलबजावणी
प्रत्येक चौकातील सिग्नलवर छप्पर बांधताना वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होईल, याची काळजी कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली आहे. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे संपण्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त सावली पडेल, अशा सुविधा करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालक देखील झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे रहात आहेत. तसेच अशा प्रकारच्या सुविधेमुळे आम्हाला आनंद झाला असून अशी सुविधा शहरात सर्वत्र व्हावी, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून केली जात आहे.
0 Comments