पंढरपूर दि. 23 :- आषाढी यात्रा सोहळ्यासमवेत लाखो वारकरी ,भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांना प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा देण्यात येतात. त्याचबरोबर आता सामाजिक संस्था पुढे आल्या असून, मुकूल माधव फाउंडेशनच्या वतीने वाखरी व पिराची कुरोली येथील पालखी तळावर बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. या सभागृहामुळे पालखी सोहळ्या समवेत येणाऱ्या वारकऱ्यांची निवाऱ्याची सोय होणार असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
वाखरी व पिराची कुरोली येथील पालखी तळावर मुकूल माधव फाउंडेशनच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून 40 लाख रुपयांची दोन बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आली आहेत.वाखरी येथील बहुउद्देशीय सभागृहाचे उदघाटन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख व प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रवी किरण घोडके , ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज, मुकूल माधव फाउंडेशनचे श्री.मेहता, श्री.कूलकर्णी तसेच वाखरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुकूल माधव फाउंडेशनच्या वतीने वाखरी व पिराची कुरोली येथील पालखी तळावर उभारण्यात आलेल्या सभागृहामुळे वारकऱ्यांच्या सुविधेत भर पडली आहे. पालखी सोहळ्यासमवेत येणाऱ्या भाविकांना सभागृहामुळे ऊन, वारा, पाऊस यांच्या पासून संरक्षण होणार आहे. तसेच या कामी ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज यांचे योगदान मोठे असल्याचेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.






0 Comments