पंढरपूर दि.25 ः सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सोलापूर जिल्ह्यातील जि.प.अंतर्गत धोकादायक शाळांबाबत सभागृहाला विचारणा केली.
सदर तारांकित प्रश्नामध्ये आमदार श्री भालके यांनी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुमारे 528 वर्ग खोल्या धोकादायक असून त्या शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याचे दि.3 एप्रिल, 2019 रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे हे खरे आहे का? असल्यास सदर धोकादायक वर्ग खोल्या पाडण्यास जिल्हा परिषदेने मंजूरी दिली असून संबंधित तालुकास्तरावरून याबाबत विलंब होत आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील 22 शाळा व 71 इमारती तसेच मंगळवेढा तालुक्यातील 17 शाळा व 48 इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे हेही खरे आहे का? असल्यास सदरहु शाळांची शासनाने पहाणी केली आहे काय? व त्यानुसार उपरोक्त धोकादायक शाळांची पुनर्बांधणी करणेसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? असा प्रश्न विचारला.
या प्रश्नाला उत्तर देतांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री मा.ना.श्रीमती पंकजाताई मुंढे यांनी पंढरपूर तालुक्यातील 39 शाळांच्या 127 वर्ग खोल्यांची व मंगळवेढा तालुक्यातील 19 शाळांच्या 56 वर्ग खोल्यांची तपासणी करण्यात आली असून पंढरपूर तालुक्यातील 34 शाळांच्या 96 वर्गखोल्या व मंगळवेढा तालुक्यातील 17 शाळांच्या 47 वर्गखोल्या धोकादायक आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्ती व शाळांच्या वर्गखोल्या बांधकामासाठी सर्व शिक्षा अभियान/जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 व सन 2018-19 या वर्षासाठी तरतुद करण्यात आली आहे असे सभागृहाला सांगितले.





0 Comments