पंढरपूर दि.01: सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी विधीमंडळात राज्यातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील वयोवृध्द कलाकारांच्या मागण्यांबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला.
राज्यातील वृध्द कलाकारांकरिता कलाकार महामंडळाची निर्मिती करावी व त्यांच्या मानधनामध्ये पाच हजाराची वाढ करावी, जिल्ह्यातील कलाकार निवडतांना असलेली प्रतिवर्षी साठच कलाकार निवडण्याची अट वाढवून 120 करावी, कलाकारांच्या उत्पन्यामध्ये वाढ करणे, तसेच मानधनामध्ये दीडपट वाढ करणे इत्यादी विविध मागण्यांचे लेखी निवेदन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी मा.मुख्यमंत्री व मा.सांस्कृतिक कार्यमंत्री यांना दि.17 जानेवारी, 2019 रोजी दिलेले होते का? तसेच सोलापूर जिल्ह्यातील 50 वृध्द कलाकारांना मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी सुमारे 1 वर्षापासून त्यांना मानधन मिळालेले नाही का? सदर प्रकरणी शासनाने वरील बाबींसाठी चौकशी केली आहे का? त्या चौकशीत काय आढळून आले? व त्याअनुषंगाने वृध्द कलाकारांच्या संख्येत व मानधनामध्ये वाढ करणेसाठी सोलापूर जिल्ह्यातील कलाकारांना मानधन देणे तसेच त्यांच्या इतर मागण्या मान्य होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केलेली आहे? असे आमदार श्री भारत भालके यांनी आपल्या तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाला विचारले.
यावर उत्तर देतांना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री विनोद तावडे म्हणाले की, राज्यातील वृध्द कलाकारांना त्यांच्या मानधनामध्ये पाच हजार रूपयाची वाढ करावी. जिल्ह्यातील कलाकार निवडतांना असलेली प्रतिवर्षी 60 कलाकार निवडण्याची अट वाढविण्यात यावी. कलाकारांच्या उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करणे. तसेच मानधनात दीडपट वाढ करणे इत्यादी प्रकारच्या विविध मागण्यांची निवेदने वेगवेगळ्या दिनांकाच्या पत्रान्वये प्राप्त झालेली आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील 50 वयोवृध्द कलाकारांना मानधन मंजूर केल्याची यादी स्थानिक प्रशासनाकडून दि.5 मे 2018 रोजी प्राप्त झाली होती. माहे ऑक्टोबर 2018 मध्ये या 50 पैकी 40 कलावंताचे बँक तपशिल प्राप्त झाले व माहे जानेवारी 2019 पर्यंत 40 कलावंतांच्या खात्यात मानधन रक्कम जमा करण्यात आलेली आहे. उर्वरित 10 कलावंतांचे बँक तपशिल अद्याप प्राप्त झालेली नसून जिल्हा परिषद, सोलापूर यांचेकडे याबाबत पाठपूरावा सुरू आहे. तसेच वृध्द कलाकारांच्या संख्येत व मानधनामध्ये वाढ करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
राज्यातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील वयोवृध्द कलाकारांच्या विविध मागण्या व मानधन वाढीसाठी आमदार श्री भारत भालके यांनी सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री तसेच शासनाच्या संबंधि खात्यांकडे लेखी पत्राद्वारे व निवेदनाद्वारे पाठपूरावा केलेला आहे. त्याअनुषंगाने सदरच्या तारांकित प्रश्नामुळे राज्यातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील वृध्द कलाकारांना दिलासा मिळाला आहे.





0 Comments