पंढरपूर दि.01 ः सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी विधीमंडळात राईनपाडा हत्याकांडातील मृत्युमुखी पडलेल्या डवरी-नाथपंथी समाजातील मृतांच्या कुटूंबियांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी पाळले नसल्याचे सांगून, सदर भटक्या-विमुक्त जमातीतील नाथपंथी डवरी-गोसावी समाजाला न्याय देणेसाठी मुख्यमंत्री महोदयांना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या मुद्दयाद्वारे विनंती केली.
एक वर्षापूर्वी म्हणजे दि.1 जुलै, 2018 रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे व मानेवाडी या गांवातील भारत भोसले, दादाराव भोसले, भारत माळवे, अगनु इंगोले व राजु भोसले हे भटक्या विमुक्त जमातीतील नाथपंथी डवरी-गोसावी समाजातील 5 जण भिक्षा मागण्यासाठी गेले असता, स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना लहान मुलांना पळवून नेणारी टोळी समजून अमानुषपणे मारहाण केली. त्यामध्ये त्या पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला.
त्यावेळी शासनाने सदर मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली. शिवाय मृतांच्या कुटूंबातील प्रत्येकी एकाला नोकरीमध्ये सामावून घेतले जाईल, पिडित कुटूंबाचे पुनर्वसन केले जाईल, पिडितांना शेत जमीन देण्यात येईल अशी घोषणा शासनाने केली होती. परंतु सदर हत्याकांडातील मयतांच्या कुटूंबियांच्या पदरी काहीच मिळाले नसल्याचे निदर्शनास येत आहे.
या सदर उपेक्षित गरीब समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांमध्ये प्रामुख्याने या समाजातील व्यक्तींना घरे देणे, त्यांना दाखले देणे व शासनाने केलेल्या वरील घोषणांच्या पुर्ततेसाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी आज विधीमंडळाच्या अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या मुद्दयाद्वारे आवाज उठविला.





0 Comments