
पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणुन पदोन्नती झाली आहे. लवकरच ते आपला पदभार स्विकारतील.
अभिजीत बापट यांनी पंढरपूर नगरपरिषदेचा पदभार स्वीकारल्यापासुन नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात सुसूत्रता आणली. नगरपरिषद प्रशासनाच्या विविध विभागातील कामांना गती देण्यासोबतच सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यात शिस्त रुजविली. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेकडून नागरिकांना मिळणार्या सर्व सोयी-सुविधा तात्काळ मिळणे सुकर झाले. विशेषत: यात्राकाळात भाविकांनाही आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी त्यांनी आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीने काम करुन दाखविले.
पंढरीत अनेक योजना राबविण्यासोबतच त्यांनी येथील भुयारी गटार टप्पा क्रमांक तीन, रस्ते रुंदीकरणाच्या योजनांना मंजुरी अशी अनेक महत्वपुर्ण कामे मार्गी लावली. नगरपरिषदेत त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक नागरिकास सन्मानपुर्वक वागणुक देण्यासोबतच तात्काळ नागरिकांचे प्रश्न सोडण्याकडे त्यांचा कल असे. एकुणच पंढरपूरकरांसह नगरपरिषदेचे इतर अधिकारी, नगरसेवक कर्मचारी यांच्यासोबत राहुन त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे कामकाज उत्तम केले.
पंढरपूर शहरातील 8 रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सांगोला रोड येथे एक आणि इसबावी येथील एक अशा 2 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, श्रीसंत तुकाराम महाराज नामसंकीर्तण सभागृह (नाट्यगृह) मंजुरी, पंथप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 हजार 92 घरांची कामे, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा विलगीकरण प्रकल्प अशी अनेक महत्वपुर्ण कामे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रयत्नातुन त्यांच्या कार्यकाळात पुर्ण झाली आहेत.
बापट यांच्या बदलीचा आदेश कालच प्राप्त झाला असुन लवकरच ते सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणुन पदभार स्वीकारतील. त्यांच्या पुढील कारकिर्दीस पंढरपूर लाईव्हकडून हार्दिक शुभेच्छा!





0 Comments