पंढरपूर दि. 04- आष्टी उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने, शेती उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक उंचावण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे केले.
मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे आष्टी उपसा सिंचन योजनेचा भुमीपूजन शुभारंभ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे, माजी आ.लक्ष्मण ढोबळे, माजी आ शहाजी पाटील, जलसंपदा विभागाचे, मुख्य अभियंता विलास राजपूर, कार्यकारी संचालक खलील अन्सारी, भिमा कालवा मंडळाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री शिवतारे बोलताना म्हणाले, आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे मोहोळ तालुक्यातील पोखरापूर, खवणी व सारोळे गावांना सिंचनासाठी पाणी मिळणार असून, या गावातील 585 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याचे सांगितले. ही योजना बंदिस्त नलिकेव्दारे राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी शेतीसाठी सूक्ष्म सिंचन योजनेव्दारे शेती करावी असे, आवाहनही जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी केले.
यावेळी भिमा कालवा मंडळाचे अधिक्षक कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी आष्टी उपसा सिंचन टप्पा क्र.2 या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनेचे माहितीपटाव्दारे सादरीकर करण्यात आले . यावेळी पंचक्रोशीतील नागरीक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 Comments