पंढरपूर – “राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ याच खऱ्या शिवाजी महाराजांच्या गुरु आहेत. इस्लामी राजवटी विरुध्द त्यांनी शिवाजी राजांना प्रेरणा देवून स्वराज्य निर्माण करण्यास प्रवृत्त केले. अफजलखान भेट, आग्रा भेट या काळात त्यांनी राज्यकारभार पाहिला. जिजाऊ या तत्त्ववेत्त्या होत्या म्हणूनच त्यांनी त्यागी व पराक्रमी शिवाजी राजा निर्माण केला.” असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात ‘राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने येथील इतिहास विभागाच्या वतीने ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे हे होते.
प्राचार्य बेलवटकर पुढे म्हणाले की, “स्वामी विवेकानंद हे भारतीय तरुणांचे आयकॉन आहेत. त्यांनी शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानाचे महत्त्व जगाला समजावून दिले. त्याग, निष्ठा व अभ्यास याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून आपणास विवेकानंदाकडे पाहता येईल. स्वामी विवेकानंदाची हिंदुत्त्वाची संकल्पना ही खूप व्यापक असून विद्यार्थ्यांनी ती मुळातून समजून घेतली पाहिजे. चारित्र्य हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श भाग आहे. शुध्द चारित्र्याने जग जिंकता येते हे उदाहरण आपणास स्वामी विवेकानंदाकडे पाहिल्यावर लक्षात येते”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “अनेकांच्या योगदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराज घडले नसते तर आज आपणास स्वातंत्र्य मिळाले नसते. देशातील स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून मिळाल्याचे दिसते. तरुणांनी स्वातंत्र्य लढे समजून घेतले पाहिजेत.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास इतिहास विभाग प्रमुख डॉ. हनुमंत लोंढे, कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य बाळासाहेब तोडकरी, उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, सिनिअर विभागातील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. रवीराज कांबळे यांनी मानले.

0 Comments