शरद पवारांच्या उपस्थितीत झाली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची बैठक... सीएए, एनपीआर संदर्भात महत्वपूर्ण चर्चा


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर)ला तीव्र विरोध असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनपीआरला जाहीरपणे पाठिंबा दिला असल्याने निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी व अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी बैठक झाली.

सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात भूमिका घेऊन त्याची अंमलबजावणी राज्यात न करण्याचा ठराव विधिमंडळात आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र त्याबाबत निर्णय झाला नसून विसंवाद टाळण्यासाठी सध्या सबुरीचे धोरण स्वीकारण्यात येणार असल्याचे समजते.

ठाकरे यांनी शुक्रवारी नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांनी नवी दिल्लीत सीएए व एनपीआरला समर्थनाची भूमिका मांडली होती. त्यास काँग्रेस नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री ठाकरे व अजित पवार यांच्यात बैठक झाली. ठाकरे यांनी दिल्ली भेटीतील चर्चेचा तपशील या बैठकीत मांडला. सीएएचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत नसून त्यामुळे देशातील नागरिकांना कोणताही त्रास नाही. तर एनपीआरसाठी जी प्रश्नावली आहे, ती तपासून ज्या मुद्दय़ावर आक्षेप असेल किंवा देशातील नागरिकांना त्रास होणार असेल, ते वगळण्याची आणि सीएए, एनपीआरच्या जाहीर समर्थनाची भूमिका न घेण्याची सूचना पवार यांनी बैठकीत केली. एनआरसीबाबत केंद्र सरकारनेच अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विरोधातील ठराव विधिमंडळात मांडून महाविकास आघाडीतील विसंवादाचे चित्र सभागृहात निर्माण होऊनये, यासाठी वादाचे मुद्दे सध्या दूर ठेवण्याचे ठरविण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तसेच साखर कारखान्यांना थकहमी देण्यावरून ठाकरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. साखर कारखाने अडचणीत असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे थकहमी देण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची सूचना पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली.

माझ्या हाती सरकारचा रिमोट कंट्रोल नाही - पवार
माझ्या हाती सरकारचा रिमोट कंट्रोल नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास शनिवारी येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून दिले, आता ते व्यवस्थितपणे काम करीत असून मी आता लांब झालो आहे, असे पवार यांनी सांगितले. 'एबीपी माझा'वरील मुलाखतीत पवार यांनी सरकारला गरज लागेल तेव्हा ठामपणे पाठीशी उभा राहीन, असेही स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments