स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरी लोगो व सहकार परिषद (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर.
Pandharpur Live - *पंढरपूर* -'व्यावसायिक व सहकार क्षेत्रांमध्ये योग्य व्यवस्थापनासाठी सहकाऱ्यांमधील आपसातील सहकार्य (कोऑर्डीनेशन) खूप महत्वाचे असते. आपापसातील व्यावहारिक संबंध कसे आहेत यावर समोरील व्यक्तीचा प्रतिसाद मिळत असतो. बंद पडलेल्या एसटी च्या आत प्रवासी भरलेले असताना पाच प्रवासी ढकलतात तेंव्हा एसटी पुढे सरकते, परंतु सर्व प्रवासी खाली उतरून मोकळी एसटी ढकलू लागतात तेव्हा तीच एसटी जागेवरून हलत नाही. याचा अर्थ असा की, आपसातील संवाद नसल्यामुळे प्रवासी एसटीच्या सर्व बाजूने त्या एसटी ला निरर्थक पणे ढकलतात. त्यामुळे आपसांत संवाद आवश्यक आहे. आपसातील संबंध जर व्यवस्थित नसतील तर श्रम जास्त करावे लागतात, पैसा जास्त खर्ची पडतो आणि पाहिजे तसा आउटपुट देखील मिळत नाही. संबंध बिघडू नयेत यासाठी एकमेकांना सहकार्य करावे. वर्तमान युगात जीवन प्रवास करत असताना परस्पर संबंध सुव्यवस्थित ठेवण्यासाठी पंधरा सूत्रांचा वापर केला तर आपले आपसातील संबंध सुधारतात आणि त्याचबरोबर आपल्या विषयी इतरांच्या मनात प्रतिमा अधिक घट्ट होते.' असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर यांनी केले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या वतीने "परस्पर संबंध" या विषयावर शेखर चरेगावकर यांचे गुगल मीट च्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रात स्वेरीच्या सुमारे २०० पेक्षा जास्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कोरोना महामारीमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत स्वेरीने आपली ज्ञानसाधना अखंड सुरु ठेवलेली आहे. स्वेरीमध्ये संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या कुशल आणि नियोजन बद्ध मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा विविध उपक्रमांच्या सहाय्याने वैचारिक उदबोधन केले जात आहे. त्या दृष्टीने मा. शेखर चरेगावकर यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मैत्रीपूर्ण संवादाच्या माध्यमातून परस्परातील संबंध कसे असावेत याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. मार्गदर्शन करत असताना शेखर चरेगावकर म्हणाले की, 'जीवनात आपण पंधरा सूत्रांचा अवलंब केला तर अपयश येणार नाही उलट अधिक यशाच्या दिशेने झेप घ्याल. सर्वांचे भले होईल असा आपला व्यवहार असावा, प्रत्येक शब्द जपून वापरावा, अनुपस्थित असलेल्या माणसांच्या अवगुणांची चर्चा करू नये, दुसऱ्यांच्या वागण्याचा योग्य अर्थ लावावा, ऐकण्याची सवय ठेवावी व ती वाढवावी, प्रथम स्वतःआनंदी रहा, इतरांची प्रशंसा करण्यात कमी पडू नका, चूक तात्काळ मान्य करा, वाद घालू नका, वचनांशी बांधील रहा, कोणतीही अपेक्षा करू नका, क्षमा करा, विनम्रता अंगी बाळगा, व दुसऱ्यांचा विचार करणारे व्हा. या पंधरा सूत्रांचा वापर तुम्ही केला तर वेळ वाचेल, पैसा अकारण वाया जाणार नाही आणि आपसातील व्यवहार देखील सुरळीत होतील.’ असे त्यांनी प्रतिपादन केले.यावेळी त्यांनी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील समर्पक उत्तरे दिली. वेबिनार च्या शेवटी, एमबीए च्या प्राध्यापिका एम.एम.भोरे यांनी सर्वांचे आभार मानले.


0 Comments