Pandharpur Live Online:
राज्य सरकारने कोरोनाबाबत कडक निर्बंध लागू केले असून यापुढे पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱया इमारत किंवा चाळीला मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले जाणार आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून संबंधित सोसायटीच्या दर्शनीभागात फलक किंवा बॅनर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सोसायटीतून ये जा करण्यास बंदी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याबाबत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज आदेश जारी केले आहेत. अशा इमारतीत आत जाण्याचा आणि बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग ठेवण्यात यावा.
सोसायटीबाहेर खासगी सुरक्षारक्षक नेमून सोसायटीत कोण जातेय यावर काटेकोर नजर ठेवण्यात यावी. सोसायटीमध्ये हॅण्ड सॅनिटायझर, तापमान मोजण्याची यंत्रणा तसेच अन्य कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा विविध सूचना देण्यात आल्या असून दहा दिवस हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करावा.
कंटेन्मेंट झोन म्हणून निर्बंध उठविण्याआधी मागील पाच दिवसांत कोणताही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही याची खात्री करून घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत.
0 Comments