Pandharpur Live: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या 8 तारखेला रात्री आठ वाजल्यापासून 15 तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व सेवा बंद राहणार आहे, असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत सांगितलं.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाच्या लाटेला थोपवण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा पुर्ण बंद राहणार आहे.
सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवा देखील 8 ते 15 पर्यंत बंद असतील. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहतील अशी घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. 8 मे रात्री 8 ते 15 मे सकाळी 7 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.
पत्रकार परिषदेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.
काय सुरु, काय बंद?
किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेता आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने देखील या आठवडाभरासाठी संपूर्णपणे बंद असतील.
मात्र नागरिकांना अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी सवलतीसाठी उद्या 7 मे शुक्रवार आणि 8 मे, शनिवारी परवानगी देण्यात आली आहे.
प्रशासनाने घोषित केलेल्या आदेशानुसार केवळ हॉस्पिटल, मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडित अस्थापनाच या काळात सुरू राहणार आहेत. दरम्यान ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील हेच आदेश लागू राहतील अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
दूध विक्री केवळ घरपोच करता येणार
दूध विक्री केवळ घरपोच करता येईल. तसेच लसीकरणसाठी जे नागरिक घराबाहेर पडतील त्यांच्याकडे नोंदणीचे मेसेज असणे गरजेचे असणार आहे. नोंदणी केलेल्या दिवशीच आणि त्याच वेळेत लसीकरणसाठी घराबाहेर पडता येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. तसेच मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडीत असलेल्यांनी आपल्या सोबत ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल अशी माहिती देखील तेजस्वी सातपुते यांनी दिली.

0 Comments