'निरोगी आयुष्यासाठी योग साधना आवश्यक'
-आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तन्मयी
स्वेरीत ‘योग साधने' वर दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- ‘योग ही एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्रिया आहे जी भारतात खूप वर्षांपासून केली जाते. शरीर आणि मन निरोगी बनवण्यासाठी योग साधना अत्यंत आवश्यक आहे. योग हा एक व्यायामाचा प्रकार असून तिथे तुमचे मन निसर्गाशी जोडले जाते आणि ते तुम्हाला तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवते. यामुळे उत्साह येवून दिवसभर प्रत्येक कार्यात उर्जा येते. यामुळे योग अभ्यासाला जगभरात प्रशंसा आणि लोकप्रियता मिळत आहे. जगभरातील लोक निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित योगाभ्यास करत आहेत. योगाभ्यास हे आत्मा आणि मनाला आराम देते. योग हा कुठेही केला जाऊ शकतो. योगा करण्यासाठी कोणत्याही जड आणि महागड्या मशीन किंवा साधनांची आवश्यकता नाही. भारतातील योगाची संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी दरवर्षी दि. २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. योगाच्या नियमित सरावाने, एखादी व्यक्ती प्रतिकारशक्ती आणि आपल्या शरीराची लवचिकता देखील विकसित करू शकते. चांगल्या प्रतिकारशक्तीसह, आपण एक चांगले आणि रोगमुक्त जीवन जगू शकतो. योगामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. योगामुळे जीवनात आत्म-जागरूकता प्राप्त होण्यास मदत होते. धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या विविध वाईट सवयी दूर करण्यासाठी योग आणि ध्यान देखील उपयुक्त आहेत. योगाकडे अनेक व्याधिंसाठी एक औषध किंवा उपचार म्हणून पाहिले जाऊ शकते.' असे प्रतिपादन पंढरपूर मधील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तन्मयी यांनी केले.
एआयसीटीई, नवी दिल्ली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये ‘योगा आणि योगाचे महत्व’ या विषयावर दि.१७ मे व दि. १८ मे २०२२ या दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. दि.१७ मे या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर येथील ध्यान साधनेचे प्रशिक्षक डॉ.प्रकाश साळुंखे यांनी स्वेरीच्या विद्यार्थ्यांना ‘योगा का करावा व योगाचे महत्व’ या विषयावर एक तासाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये स्वेरीतील जवळपास अकराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१८ मे रोजी इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये योगाचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. यामध्ये १२० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. पंढरपूर मधील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तन्मयी यांनी योगाचे प्रात्यक्षिक दिले. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देताना त्या पुढे म्हणाल्या कि, ‘योग ही स्वत: चा उपचार करण्याची पद्धत आहे. रक्त परिसंचरण चांगले करण्यास योगाची मदत होते आणि रोग कमी होतो. कोलेस्ट्रॉल, मधुमेह, स्नायू समस्या आणि अशा इतर आजारांपासून मुक्ती मिळण्यासाठी योगाची मदत होते. आजच्या व्यस्त जीवनात तणाव दूर करण्यासाठी योगाकडे एक औषध म्हणून देखील पहिले जाते.’ यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुभाष जाधव आणि इतर प्राध्यापक सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. संजय मोरे यांनी मानले.
0 Comments