औरंगाबाद - दाढीला हात लावल्याने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली. हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी एकत्र बसले असतानाच झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या झाली. घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अब्दुल उर्फ सांडु कम्मा शेख (वय-35 वर्ष रा.पिंपळवाडी पिराची ता.पैठण ), रामेर उर्फ राम गजेसिंग बोत (वय-38 वर्ष रा. साखर कारखाना कॉलनी एमआयडीसी ता. पैठण ) दोघेही मित्र आहेत.
मंगळवार दुपारी अडीचच्या सुमारास दोघेही पैठण-औंरगाबाद महामार्गावरील पिंपळवाडी येथे एका हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी गेले होते. मात्र, याचवेळी राम बोत याच्या दाढीला मयत सांडु शेख याने हात लावला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
राम याने बाजूला असलेल्या अंडा आम्लेटच्या दुकानात असलेल्या कांदा कापण्याच्या चाकुने सांडू याच्या पाठीत दोन वार केले. यामध्ये सांडू हा गंभीर जखमी झाला, त्याला औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांच्यासह सपोनि भागवत नागरगोजे यांनी तात्काल घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ईसारवाडी शिवारातील एका ऊसात लपून बसलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ शफिक शेख यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





0 Comments