मित्राच्या अंगावर असलेले २५ तोळे सोने बळकावण्यासाठी बिबवेवाडीमधील वास्तुशास्त्र सल्लागाराच्याच मित्राने अपहरण करून खून केला. त्यानंतर मृतदेह नीरा नदीत फेकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराच्या मित्रासह साथीदाराला अटक केली आहे.
नीलेश दत्तात्रेय वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. याप्रकरणी वरघडे यांचा मित्र दीपक जयकुमार नरळे (रा. नऱ्हे, आंबेगाव) आणि त्याचा साथीदार रणजित ज्ञानदेव जगदाळे (वय २९) यांना अटक केली आहे. १६ ऑक्टोबर रोजी वरघडे घरी न आल्याने त्यांची वहिनी रूपाली रूपेश वरघडे (वय ४०) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
वरघडे यांना सोन्याच्या दागिन्यांची आवड होती. घटनेच्या दिवशी त्यांनी २५ तोळे सोन्याचे दागिने घातले होते. या दागिन्यांवर नजर ठेवत दोन्ही संशयित आरोपी वरघडे यांना एका पूजेसाठी नऱ्हे परिसरात नेले. तेथे त्यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर संशयित आरोपींनी वरघडे यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून देऊन संशयित आरोपी पसार झाले.
१६ ऑक्टोबरला वरघडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार नरळेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. चौकशीत पोलिसांना तो वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करत होता. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी नरळे आणि जगदाळे यांनी खून केल्याची कबुली दिली.
सीसीटीव्ही चित्रीकरणात संशयित आरोपी आढळून आले आहेत. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे संगीता जाधव, प्रवीण काळुखे आदींनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला.
0 Comments