कोरेगाव पार्कमध्ये दोन टोळ्यांमधील वादातून गोळीबाराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि.25) रात्री लोहगावात दोन ठिकाणी गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारुच्या नशेत आपण 'भाई' असल्याचे सांगत एका टोळक्याने हे कृत्य केले.
टोळीतील चौघानांही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन सकट (वय 21), गणेश राखपाखरे (वय 21, दोघे रा. राखपाखरे वस्ती, लोहगाव) व त्यांच्या दोन साथीदारांविरुध्द दहशत पसरवणे आणि आर्म ऍक्टनुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर अगोदर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत.
शुक्रवारी रात्री ते दारू पिले. त्यानंतर आपणच परिसरातील “भाई’ आहोत, आपला परिसरात वट पाहिजे, अशी त्यांची चर्चा झाली. यानंतर ते संत तुकाराम चौकात दुचाकीवरून आले. तेथे नितीन सकट याने पिस्तूल बाहेर काढून हवेत दोन गोळ्या झाडल्या.
तेथील लोकांना धमकावत “कोणी आमच्या वाट्याला गेले तर आम्ही एका एकाला गोळ्या घालू, कोणालाही जिवंत सोडणार नाही’, असा दम भरला.
त्यानंतर ते दुचाकीवरुन गणपती चौकात गेले. तेथे सकटने पुन्हा एकदा हवेत गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शांतमल कोळळुर करीत आहेत.
0 Comments